जगातील सर्वोत लठ्ठ महिलेसाठी मुंबईत दोन कोटींचे हॉस्पिटल


मुंबई – सैफी रुग्णालयाकडून विशेष ‘वन बेड हॉस्पिटल’ जगातील सर्वोत लठ्ठ महिला असणा-या इमान अहमद यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी बांधण्याची तयारी सुरु झाली असून तब्बल दोन कोटींचा खर्च या विशेष रुग्णालयासाठी केला जाणार आहे. या रुग्णालयात एका मोठ्या रुग्णालयात मिळणा-या सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत. लवकरच मुंबईत इजिप्तमधील अलेक्झॅन्ड्रियामधील इमान अहमद अब्लदुलाती या ५०० किलो वजन असलेल्या ३६ वर्षीय महिलेवर शस्त्रक्रिया होणार आहे.

हे हॉस्पिटल तीन हजार फूट परिसरात उभे राहणार आहे. एक ऑपरेशन थिएटर, आयसीयू, डॉक्टरांसाठी खोली, दोन विश्रांतीगृह आणि तळमजल्यावर एक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग रुम यामध्ये असणार आहे. इमान अहमद यांचे वजन लक्षात घेता त्याआधारे सर्व वस्तूंची उपलब्धता आणि जागेचे बांधकाम करण्यात आले आहे. यामध्ये ७ फूट रुंद दरवाजे बांधण्यात आले असून, बेडदेखील ७ फूट रुंद असणार आहे. ही शस्त्रक्रिया मुंबईतील प्रख्यात बेरिएट्रिक सर्जन डॉ. मुफ्फजल लकडावाला करणार आहेत. त्यांच्यासोबत विशेष टीम उपस्थित राहणार असून ऑपरेशन झाल्यानंतरदेखील २४ तासांसाठी त्यांना देखरेखेखाली ठेवण्यात येणार आहे.