राष्ट्रपतीपदाचे वेध


गेल्या वर्षाच्या शेवटी आणि नव्या वर्षाच्या सुरूवातीला राजकारणाचा आढावा घेणारे अनेक लेख छापले गेले पण या वर्षात राष्ट्रपतींची निवडणूक होणे अपेक्षित असतानाही या निवडणुकीबाबत फारशी चर्चा झाली नाही. कारण अजून राजकीय क्षेत्रात या संबंधात कसलीही चर्चा सुल झालेली नाही. आता मात्र या बाबत काही संकेत मिळायला लागले आहेत. दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग यांना उपराष्ट्रपतीपदाचा मान मिळेल असे दिसत आहे. खरे तर त्यांनी आपल्या या पदाचा काही कारण नसताना आणि मुदत पूर्ण झालेली नसतानाही अचानकपणे राजीनामा दिलेला होता. त्याच वेळी ते या पदाला उत्सुक असल्यामुळे राजीनामा देऊन मोकळे होत आहेत की काय अशी शंका काही लोकांनी व्यक्त केली होती पण त्यावर फार चर्चा झाली नाही.

आता मात्र त्यांचा तसा प्रयास असावा आणि त्याला सत्ताधारी रालोआघाडीने दुजोरा दिला तर त्यांना हा मान मिळू शकतो. भाजपाचा त्यांना आशिर्वाद मिळू शकतो. ते तसे कॉंग्रेसशी जवळीक साधूनच नायब राज्यपाल झाले होते पण नंतर त्यांनी केन्द्रात सत्तापालट होताच त्यांनी आपल्या निष्ठा भाजपाला अर्पण करून अरविंद केजरीवाल यांना तंग करण्याचे काम केले. आता त्यांच्यावर भाजपानेेते खुष आहेत. त्यांना उपराष्ट्रपती करणें हे भाजपासाठीही आपली प्रतिमा चांगली करण्यासाठी आवश्यकच आहे. राष्ट्रपती पदासाठी अजून तरी कोणाच्या नावाची फार जोरदार चर्चा होत नसली तरी आता काही राजकीय निरीक्षकांना या पदावर आताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांना संधी मिळू शकेल असे वाटायला लागले आहे.

जेटली यांची या पदावर निवड झालीच तर काही लोकांसाठी ती अनपेक्षित असेल कारण आपल्या नेहमीच्या पद्धतीने काही पत्रकार या पदांसाठी अडवाणी किंवा मुरली मनोहर जोशी यांच्या नावावर पैजा लावायला लागले आहेत. सत्तेच्या वरिष्ठ पातळीवर मात्र वेगळेच पेच टाकले जात आहेत. अर्थमंत्री जेटली हे तसे अभ्यासू आहेत पण त्यांची आर्थिक धोरणे पंतप्रधान मोदी यांना म्हणावी तेवढी पसंत नाहीत. जेटली यांच्याऐवजी दुसरा अर्थमंत्री नेमण्याचा विचार मोदी कधी कधी करीत असतात. मात्र त्यांना हा बदल म्हणावा तेवढा सोपा वाटत नाही. म्हणून त्यांना राष्ट्रपती करून अर्थमंत्रिपदावरून हटवण्याचा मोदींचा प्रक्त्न आहे असे काही लोकांना दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या डावाला सरसंघचालकांचाही पाठींबा आहे.

Leave a Comment