जवानांच्या अन्नात तडजोड नको


सीमा सुरक्षा दलातल्या तेज बहादूर यादव या जवानाने आपल्या युनिटमध्ये निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याची तक्रार केली असून सरकारने तिची चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले आहे. सरकारचे ते कर्तव्यच आहे. या जवानाने ही तक्रार करताच सीमा सुरक्षा दलाने खुलासा केला. अन्न चांगलेच असते असे स्पष्टीकरण केले. पण शेवटी ज्या खात्यावर असा आरोप होतो त्या खात्याकडून असाच खुलासा अपेक्षित असतो. तसा तो सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांनी केला पण त्यात काही तथ्य नाही कारण या युनिटच्या रेशनमध्ये भ्रष्टाचार होत असेल तर तो काही महासंचालकांना दाखवून आणि सांगून होत नसतो. तेव्हा स्थानिक पातळीवर भ्रष्टाचार होत असेल तर तो संपवला पाहिजे आणि अचानकपणे पाहणी करून अन्नाचे नमुने तपासण्याची पद्धत हवी.

तेज बहादूर यादव याने तक्रार केल्यानंतर सीमा सुरक्षा दलाने तोच कसा बेशिस्त आहे आणि त्याच्यावर गैरवर्तणकीची कारवाई अनेकदा कशी झाली आहे हे वर्णन करून सांगितले. तसे असेलही किंबहुना आहेही पण तसे आहे म्हणून त्याने केलेली तक्रार चुकीची आहे असे म्हणता येणार नाही. कोणतेही न्यायालय हे मान्य करीत नाही. तक्रार करणारा किंवा साक्ष देणारा हा व्यसनी आहे या वरून त्याची साक्ष किंवा तक्रार ही खोटी आहे असे मानावे असे न्यायालय कधी म्हणत नाही. तेव्हा तेजबहादूर हा व्यसनी आहे म्हणून त्याचे म्हणणे ग्राह्य मानू नये असा काही युक्तिवाद सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांना करायचा असेल तर तो त्यांनी खुशाल करावा पण त्यावरून सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना चांगलेच अन्न मिळते हे सिद्ध होणार नाही आणि लोकही ते मान्य करणार नाहीत.

तेजबहादूर यादव हा हरियाणातला असून त्याच्या घरात लष्करी सेवा करण्याची परंपरा आहे. त्यामुळे त्याच्या या तक्रार करण्यामागच्या हेतूवर संशय घेता येत नाही. त्याने ही तक्रार केल्याबद्दल होणारी शिक्षा भोगण्याची तयारी दाखवली आहे. तो येत्या ३१ जानेवारीला स्वेच्छा निवृत्ती घेण्याचे ठरविले आहे. त्याचा राजीनामा मंजूरही झाला आहे. पण आपण जाता जाता आपल्या युनिटमधील जवानांच्या तक्रारीला वाचा फोडू शकलो याचा त्याला आनंद आहे. महासंचालकांनी खुलासा करताना, अन्य कोणत्याही जवानांची अशी काही तक्रार नाही असे म्हटले आहे पण तेजबहादूर याने तक्रार केल्यानंतर त्याच्या युनिटमधील जवानांनी आनंद व्यक्त केला अशीही बातमी आहे.

Leave a Comment