आता मॅकडोनाल्ड्समध्ये मिळणार मसाला डोसा बर्गर


मुंबई : ‘आय अॅम लव्हिन् इट!’ अशी टॅगलाईन असलेल्या मॅकडोनाल्ड्सच्या पाश्चात्य बर्गरमध्ये भारतीय चव सामावणार असून मसाला डोसा ते अंडा भुर्जी असे वैविध्य असलेले बर्गर्स आणण्याच्या तयारीत मॅकडी आहे.

तरुणवर्गाला ब्रेकफास्टमध्ये मॅकडीच्या क्रांतिकारी मेन्यूने पर्यायांची विविधता मिळणार आहे. ग्राहकांना सकाळच्या वेळेत खेचून आणण्यासाठी हा बदल करण्याचा कंपनीचा मानस आहे. मोलगा पोडी सॉस असलेले मसाला डोसा बर्गर, अंडा बुर्जी हे पदार्थ मॅकडोनाल्ड्सच्या मेन्यूकार्डमध्ये पाहायला मिळतील.

हा नवा मेन्यू मॅकडीमध्ये येत्या वीकेंडला दिसण्याची शक्यता आहे. याची सुरुवात मुंबईपासून होईल, त्यानंतर हळूहळू देशभरातील मॅकडीच्या आऊटलेट्समध्ये हा नाश्ता मिळेल. सोबक स्पिनच आणि कॉर्न ब्रोशे, प्लेन किंवा मसाला स्क्रॅम्बल्ड एग्ज, वॅफल्स, हॉटकेक्स हे पदार्थही ब्रेकफास्टला मिळतील. आरोग्यदायी न्याहारीसाठी तळलेल्या पदार्थांऐवजी ग्रिल्ड मेन्यू असेल.

कंपनीची उडपी किंवा इराणी रेस्टॉरंटशी थेट स्पर्धा नाही. मॅकडीमध्ये डोसा विकला जाणार नसून, त्या फ्लेव्हरचे बर्गर असतील, असे सांगण्यात आले आहे. मात्र मॅकडीने केएफसी, पिझा हट, बर्गर किंग, डॉमिनोज यासारख्या प्रतिस्पर्ध्यांना आव्हान दिले आहे. यापूर्वी डॉमिनोजने नवरात्रीच्या काळात उपवासाचे पिझ्झा बाजारात आणले होते.

Leave a Comment