स्पॉटिफायची ओबामांना नोकरीची ऑफर


जगातील सर्वात बडी स्ट्रीमिंग सेवा देणारी कंपनी स्पॉटिफायने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना नोकरीची ऑफर दिली आहे. त्यामुळे येत्या कांही दिवसांतच ओबामांची राष्ट्रपतीपदाची जबाबदारी संपली तरी त्यांच्यावर बेरोजगार राहण्याची वेळ येणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार ओबामांनी स्वतःच माझी प्लेलिस्ट सर्वांना आवडते याची कल्पना आहे व त्यामुळे स्पॉटिफायकडून मी नोकरीची ऑफर येण्याची प्रतीक्षा करतो आहे असे एका कार्यक्रमात मजेने सांगितले होते.

ओबामांची ही चेष्टा मनावर घेऊन स्पॉटिफायने त्यांना प्रेसिडेंट ऑफ प्लेलिस्टस साठी उमेदवार हवा आहे अशी जाहिरात दिली व त्यात उमेदवाराला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा आठ वर्षांचा अनुभव हवा, तसेच त्यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळालेला असावा, उमेदवारला कलाकारांसंबंधी चांगली माहिती असावी, तो चांगला वक्ता असावा. प्लेलिस्टस संबंधी बोलताना त्याला जोशात बोलता यायला हवे अशा अटी कळविल्या होत्या. कंपनीचा सीईओ डॅनियल याने ट्विट करताना ही जाहिरात दिल्याचे नमूद केले होते.