लातूरच्या आनंदवाडी गावाचा अवयवदानाचा संकल्प


लातूर – लातूरच्या आनंदवाडी गावाने अवयवदानाची मोहीम हाती घेतली असल्यामुळे देशपातळीवर त्यांचा गौरव केला जात आहे.

आनंदवाडी लातूर जिल्ह्यातील जेमतेम लोकसंख्या असणारे गाव. पण येथील गावकऱ्यांच्या कामगिरीने महाराष्ट्राची मान अभिमान ताठ झाली आहे. कारण या गावाने अवयव दानाच्या उपक्रमात देशात अग्रेसर येण्याचा बहुमान पटकावला आहे. गतवर्षी गावकरी १४ ऑगस्टला स्मशामभूमीत श्रमदान करण्यासाठी एकत्र आले. मात्र त्याचवेळी ग्रामसेवकाने त्यांच्यासमोर अवयवदानाची कल्पना मांडली. ही कल्पना गावकऱ्यांनी नुसती ऐकूनच घेतली नाही, तर संपूर्ण गावाने एकमुखाने मरणोत्तर अवयवदानाचा निर्णयही घेतला.

दरम्यान गावचे रस्ते असो किंवा ग्रामपंचायतीची इमारत, सगळ्या गोष्टी गावकऱ्यांनी स्वत: उभारल्या. आजवर या गावात ना कधी ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली, ना कधी कोणी एकमेकांच्या नावाने शिमगा केला. त्यामुळेच या गावाला मिळालेला तंटामुक्त गावाचा पुरस्कार गावकरी आजही प्रेमाने जपत आहेत. या गावातील प्रत्येक घराच्या मुख्य द्वारावर घरकर्त्या पुरुषाचे नाही तर घर सांभाळणाऱ्या घरातील कारभारणीच्या नावाचा फलक हे या गावचे वैशिष्ट्य आहे. अशा एक ना अनेक स्तुत्य उपक्रमांमुळे आनंदवाडीची चर्चा आणि कौतुक संबंध राज्यात होत आहे.