‘पैशांच्या जीवावर उमेदवारांचा घोडेबाजार’

राज ठाकरे यांची भाजप, शिवसेनेवर टीका

मुंबई: इतर पक्षांकडे उमेदवारांचा घोडेबाजार करण्यासाठी बक्कळ पैसे आहेत. माझ्याकडे नाहीत; अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेवर टीका केली. नुकतीच शिवसेनेशी युती करण्याची तयारी दाखविणाऱ्या राज यांनी आज मात्र स्वबळावर मुंबई महापालिकेच्या सर्व जागा लढविणार असल्याची घोषणा केली.

मनसेच्या फेसबुक वेब पेजवरून ठाकरे यांनी नेटकरांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या. सच्चे कार्यकर्ते अजून माझ्यासोबत असून त्यांच्या बळावरच मुंबईत ६० नगरसेवक निवडून आणू; असा विश्वासही राज यांनी व्यक्त केला.

नाशिकच्या महापालिकेचे सगळे कर्ज फेडून शहरात अनेक विकासकामे घडवून आणण्यात मनसे यशस्वी झाली आहे. नाशिकमधील कामे इतर महापालिकांमधील नागरिकांच्या नजरेसमोर आणा आणि या विकासासाठी मनसेला सत्ता देण्याचे आवाहन करा; असे राज यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. कोणतेही काम न करणाऱ्यांकडे तुम्ही राज्याची सत्ता दिली आहे. मात्र महापालिकेत मनसेला सत्ता द्या; मी तुम्हाला विकास घडवून दाखवतो; असे आश्वासन देताना त्यांनी सत्ताधारी भाजप आणि मतदारांनाही चिमटा घेतला.

नोटबंदीमुळे सर्वसामान्य नागरिक भरडून निघत असताना भाजपाला त्याचा त्रास कसा होत नाही; असा सवालही राज यांनी केला. सत्ता एकत्रितपणे उपभोगत असताना शिवसेनेच्या भ्रष्टाचारातील सहभाग भाजप कसे नाकारू शकतो; असा प्रश्नही त्यांनी केला आहे. राज्यातील सर्व टोलनाके मनसेच्या आंदोलनांमुळेच बंद झाले. मात्र त्यासाठी मनसेचे कोणी कौतुक करत नाही; अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

माणसे जिवंत राहण्यासाठी पैसे खर्च न करता सरकार इतर बाबींवर पैसे खर्च करीत असल्याचा आरोप करून राज यांनी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या शिवस्मारकाच्या निर्णयावर टीका केली. हे शिवस्मारक उभारण्यासाठी सरकारकडे पैसे आहे का; असा सवाल करून निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच सरकारने शिवस्मारकाच्या घोषणा केल्याचा आरोप त्यांनी केला. शिवस्मारकाऐवजी गड, किल्ल्यांची डागडुजी करा; असे आवाहनही त्यांनी केले.