देशातील पहिली १०० टक्के बायोडिझेल लक्झरी बस कर्नाटकातून धावणार


नवी दिल्ली – कर्नाटक परिवहन अर्थात केएसआरटीसीने (कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन) वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी १०० टक्के बायोडिझेलवर धावणाऱ्या २५ लक्झरी खरेदी केल्या असून बंगळुरू ते तिरूपती, चेन्नई, बिदर आणि कुडानपुरा येथे या बस धावणार आहेत. बायोडिझेलवर धावणाऱ्या या प्रत्येक मल्टिअॅक्सल बसची किंमत ९१.१० लाख ऐवढी आहे. या बस डिझेल व बायोडिझेलवर धावू शकतील. १०० टक्के बायोडिझेलवर धावणाऱ्या या भारतातील पहिल्याच बस असल्याचा दावा केएसआरटीसीने केला आहे.

या सर्व बसला बायोडिझेल किट बसवण्यात आलेले आहे. या बसमुळे हवेत होणारे प्रदूषण टळणार आहे. या बसची खास रचना करण्यात आली आहे. यातून आरामदायक प्रवास करता येईल अशा पद्धतीने याचे डिझाइन तयार करण्यात आले आहे. प्रत्येक सीट्सच्या रांगेत लॅपटॉप आणि मोबाइल चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे.

त्याचबरोबर प्रवाशांच्या मनोरंजनासाठी रांगेत फोल्डेड एलसीडी मॉनिटर आणि डिव्हिडी प्लेअरची सुविधा देण्यात आली आहे. जर्मनीतील टीयूव्ही कंपनीने या सर्व बसची तपासणी करून प्रवासासाठी अत्यंत सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.