ती सध्या ‘बॉक्स ऑफिसवर घोडदौड कमाई’ करते


सध्या बॉक्स ऑफिसवर कमाईचे रेकॉर्ड ‘दंगल’ हा चित्रपट कायम करत आहे. तर दुसरीकडे मराठी सिने इंडस्ट्रीचीही नवीन वर्षाची सुरूवात धडाक्यात झाली आहे. २०१७ मधील पहिला मराठी चित्रपट ‘ती सध्या काय करते’ याला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरही कमाल दाखवली आहे. मराठी चित्रपटाची सुरूवात चांगली झाल्याने सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे.

‘नटसम्राट’ ‘सैराट’ ‘व्हेंटिलेटर’ या तिनही चित्रपटांनी गेल्या वर्षात मोठी धमाकेदार कमाई केली होती. बाकी चित्रपटांनी ठिक कमाई केली. पण वर्षभर सर्वात जास्त जर कोणता चित्रपटा गाजला तर तो म्हणजे ‘सैराट’. आता ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाचीही जोरदार चर्चा सोशल मिडियात रंगली आहे. या चित्रपटालाही भरभरून प्रतिसाद दिला जात आहे. बॉक्स ऑफिसवर ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाने धुमाकूळ घातला असून या चित्रपटाने तीन दिवसांत साडेपाच कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाचा प्रदर्शित झाल्यापासून पहिल्या तीन दिवसांत झालेल्या कमाईचा आकडा मात्र तिकीटबारीवरची मरगळ घालवणारा ठरला आहे. गेल्या वर्षी ‘नटसम्राट’ या चित्रपटाने तीन दिवसांत सहा कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘ती सध्या काय करते’ने ही आकडेवारी ओलांडली नसली तरी त्याच वेगाने चित्रपटाची घोडदौड सुरू असल्याचे ‘झी स्टुडिओज’च्या सूत्रांनी सांगितले.