जाऊ पुस्तकाच्या गावा


महाराष्ट्र सरकारने जानेवारीचा पहिला पंधरवडा हा मराठी पंधरवडा म्हणून जाहीर केला असून या पंधरा दिवसात राज्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठीच्या विकासासाठी आणि मराठी भाषेचे प्रेम जनतेत वाढावे यासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या बाबत राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे हे मोठे उत्साहात आहेत. पण त्यांचा हा मराठी पंधरवडा सरकारी झाला आहे. जनतेत या निमित्ताने जो उत्साह असणे आवश्यक होते तो उत्साह अभावानेच आढळत आहे.सरकारी पातळीवर वरून सूचना आल्यात म्हणून जुलमाचा रामराम करीत हा कार्यक्रम सरकारी यंत्रणांत साजरा होत आहे. राज्यात मराठीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी कार्यरत असल्याचा दावा करणार्‍या महाराष्ट्र साहित्य परिषदेसारख्या संघटना या पंधरवड्याबाबत उदासीन आहेत.

सरकारने मात्र चांगले कार्यक्रम आयोजित केले आहेत. या निमित्ताने सरकारने जाहीर केलेला एक उपक्रम मोठा कल्पकतापूर्ण आहे. ब्रिटनमध्ये एक गाव पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाते. तिथे ब्रिटनमध्ये प्रसिद्ध होणारे प्रत्येक पुस्तक विकत मिळते. त्या गावाला वाचनवेेडे लोक सुटी मिळाली की भेट देतात आणि पर्यटनाचे दोन तीन दिवस तिथे पुस्तकांच्या संगतीत घालवतात. मनसोक्त पुस्तके विकतही घेतात. एकंदरीत पुस्तक पर्यटन नावाचा प्रकार तिथे या निमित्ताने उदयाला आला आहे. असेच एक पुस्तक ग्राम महाराष्ट्रातही उभारण्याचा सरकारचा प्रयास जारी आहे. त्याला प्रकाशकांनी आणि विक्रेत्यांनी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे.

वाई आणि महाबळेश्‍वराच्या सान्निध्यात हे पुस्तकाचे गाव उभारले जात आहे. तिथे राज्यातल्याच काय पण बाहेरच्याही पुस्तक प्रेमींना सगळी पुस्तके पहायला आणि खरेदी करायला मिळतील. मराठीत पुस्तके वाचणारे आणि खरेदी करणारे कमी होत आहेत अशी ओरड काही लोक करीत असतात पण प्रत्यक्षात ही संख्या वाढत असल्याचा प्रकाशकांचा अनुभव आहे. वाढते राहणीमान आणि वाढती क्रयशक्ती यांचा वापर पुस्तके खरेदी करण्यासाठी करावा अशी भावना आता लोकांच्या मनात जागी होत आहे. या लोकांना हे पुस्तक ग्राम म्हणजे उत्तम संधी आहे. वर्षा दोन वर्षाला एकदा या गावाला जायचे आणि तिथे खरेदी केलेली पुस्तके वाचत वर्षभर कालक्रमणा करायची ही निवृत्त जीवनाची किती चांगली कल्पना आहे हे निवृत्त जीवन जगणार्‍या पुस्तकप्रेमींनाच लक्षात येईल.

Leave a Comment