एक तृतीयांश औषधांमध्ये ‘जुनाच मसाला’


औषध कंपन्या दर वर्षी नवीन औषधे बाजारात आणत असल्या, तरी यातील एक तृतीयांश औषधांमध्ये काहीही नवे नसते, तोच तो जुना मसाला असतो, असे जर्मनीतील एका संस्थेने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे.

जर्मन पब्लिक हेल्थ इन्श्युरर्स असोसिएशन (जीकेवी) या संस्थेने ही पाहणी केली आहे. यानुसार, 2012 सालापासून बाजारात एकूण 129 औषधे आली आहेत. त्यातील केवळ एक तृतीयांश (44) मध्ये काही नवीन घटक किंवा मोठे बदल होते, तर 44 औषधांचा काही रुग्णांवर परिणाम झाला. मात्र बहुतांश रुग्णांवर त्यांचा काहीही परिणाम झाला नाही. तर एक तृतीयांश औषधांमध्ये काहीही नवे नव्हते.जर्मनीतील अनेक वृत्तपत्रांनी ‘एक तृतीयांश नवे औषधे बेकार आहेत,’ अशा शीर्षकाने हे वृत्त छापले आहे. मात्र ही औषधे बेकार नाहीत, तर अनावश्यक आहेत, असे संस्थेचे म्हणणे आहे.

“या संपूर्ण चर्चेचा केंद्र औषधांचा परिणाम हा नाही, तर जी नवी औषधे येत आहेत, त्यांचा काहीही अतिरिक्त फायदा आहे का नाही, हा आहे,” असे फेडरल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकेशन अँड मेडिकल प्रॉडक्ट्सचे प्रवक्ते माइक पोमर यांनी डॉयट्शे वेलेशी बोलताना सांगितले.

या एक तृतीयांश औषधांमध्ये कोणतीही भर आढळली नाही, यावर जीकेवीच्या उप प्रवक्त्या ऐन मारिनी यांनी शिक्कामोर्तब केले. मात्र वृत्तपत्रांनी जे छापले ते एक प्रकारचे विश्लेषण आहे, संपूर्ण पाहणी नाही, असे त्या म्हणाल्या. “एखादे औषध बाजारात येते तेव्हा त्यावर नवीन लेबल लानलेले असते, मात्र त्यात नवीन काही आहे का नाही किंवा बाजारात असलेल्या औषधापेक्षा ते अधिक चांगले आहे का नाही, हे आपल्याला माहीत नसते. यासाठी आम्ही हे पाऊल उचलले,” असे त्या म्हणाल्या.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही