अक्षयसोबत ‘पॅडमॅन’मध्ये झळकणार या दोन अभिनेत्री


२०१७ या वर्षात अभिनेता अक्षय कुमार काही वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपल्या आगामी चित्रपटांचे काही हटके पोस्टरही अक्षयने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे काही दिवसांपूर्वीच शेअर केले होते. त्यातील एक म्हणजे त्याचा आगामी ‘पॅडमॅन’ हा चित्रपट. या चित्रपटाचे कथानकही नव्या धाटणीचे असणार आहे अशी चर्चा सध्या चित्रपट वर्तुळामध्ये रंगत आहे. या चित्रपटाचे कथानक अरुणाचलम मुरुगनाथम या खऱ्याखुऱ्या ‘पॅडमॅन’च्या जीवनातील काही महत्त्वाच्या प्रसंगांवर आणि स्वस्त सॅनिटरी पॅड बनविणाऱ्या या व्यक्तिच्या खडतर प्रवासावर बेतले असून अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख निश्चित झाली नसली तरीही चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मात्र कमालीची उत्सुकता पाहायला मिळते.

कोणत्या अभिनेत्रीच्या नावाला या चित्रपटासाठी प्राधान्य दिले जाणार याबद्दल अनेकजण अंदाज बांधत असतानाच या चित्रपटातील अभिनेत्रींच्या नावावरुन सरतेशेवटी पडदा उठला आहे. त्याच्या आगामी चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनम कपूर आणि राधिका आपटे अक्षयसोबत झळकणार आहे. सोनमने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत याबाबतची अधिकृत माहिती दिली. राधिकानेसुद्धा या चित्रपटासंबधीचा एक फोटो रिट्विट करत सर्वांचेच लक्ष वेधले.