भारतात १९ जानेवारीला येणार ‘रेडमी नोट ४’


नवी दिल्ली – भारतीय बाजारात लवकरच चीनची कंपनी शाओमीचा नवा स्मार्टफोन लाँच होणार असून हा फोन भारतात कंपनीने १९ जानेवारीला लाँच करण्याचे ठरवले आहे. रेडमी नोट हा शाओमीचा फ्लॅगशिप ब्रॅंड असून या फोनची आतुरतेने वाट पाहिली जात होती. शाओमीला भारतीय बाजारपेठेमध्ये जोरदार मागणी असून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण डिजाईन आणि अद्ययावत तंत्रज्ञानासाठी हा फोन ओळखला जातो. मागील वर्षी ऑगस्टमध्ये चीनमध्ये हा फोन लाँच झाल्यानंतर हा फोन भारतात कधी येतो याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली होती.

दोन व्हॅरियन्ट्समध्ये रेडमी नोट ४ हा फोन उपलब्ध होणार आहे. २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल मेमरी असणाऱ्या फोनची किंमत ९,००० रुपये असेल तर ३ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल मेमरी असणाऱ्या फोनची किंमत १२,००० रुपये राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सोनेरी, राखाडी आणि चंदेरी रंगांमध्ये हा फोन उपलब्ध होईल. या फोनला फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. ड्युएल सिमवर चालणाऱ्या या फोनला अॅंड्रॉइड ६.० मार्शमेलो ही ऑपरेटिंग सिस्टम आहे.

Leave a Comment