नोटबंदीनंतर निष्क्रिय खात्यांमध्ये जमा झाले २५ हजार कोटी रुपये

६० लाख बँक खात्यांमध्ये प्रत्येकी दोन लाखांहून अधिक रोख रक्कम जमा

नवी दिल्ली – सोमवारी करवसुलीची आकडेवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केल्यानंतर आज बँक खात्यांमध्ये नोटबंदीनंतर जमा झालेल्या रोख रकमेची माहिती समोर आली असून ६० लाखांहून अधिक बँक खात्यांमध्ये प्रत्येकी दोन लाखांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे, अशी माहिती उघडकीस आली आहे. नोटाबंदीनंतर बँकांमध्ये तीन ते चार लाख कोटी रुपये अघोषित संपत्ती जमा झाली आहे. आयकर विभाग त्याची चौकशी करत असल्याची माहिती एका बँक अधिकाऱ्याने दिली आहे.

नोटाबंदीनंतर लोकांनी कर्जफेडीसाठी जुन्या नोटांच्या स्वरुपात ८० हजार कोटी रुपयांची रक्कम जमा केली आहे. तर निष्क्रिय खात्यांमध्ये २५ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. दरम्यान, सहकारी बँकांमधील विविध खात्यांमध्ये जमा झालेल्या १६ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची आयकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालय कसून चौकशी करत आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Leave a Comment