शिवसेना भवनावरील बाळासाहेबांचे चित्र हटवा – संभाजी ब्रिगेड


मुंबई- पुण्याच्या संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा उखडून टाकण्याचे प्रकरण ताजे असतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चित्रांवर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. दादरच्या ऐतिहासिक शिवसेना भवनावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या डोक्यावर बाळासाहेब ठाकरे यांचे असलेले चित्र हटवा, नाहीतर ब्रिगेड आपल्या पद्धतीने ते चित्र काढून टाकेल, अशी धमकी संभाजी ब्रिगेड पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

शिवरायांच्या नावाचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायम वापर करत राजकारण केले. मुस्लिम आणि मराठ्यांमध्ये दंगली पसरवल्या. आता शिवरायांपेक्षा बाळासाहेबांना शिवसेना मोठे समजू लागली आहे. त्यामुळेच शिवसेना भवनावर छत्रपती शिवराय छोटे आणि बाळासाहेब मोठे दाखवण्यात आले आहेत. शिवसेनेने शिवरायांची ही केलेली बदनामीच असल्याचा आरोप आखरे यांनी केला. सेना भवनावरील बाळासाहेबांचे चित्र काढण्यात यावे, त्याबाबतचे निवेदन ब्रिगेडने मुंबई पोलिस आयुक्त, मुख्यमंत्री आदींना दिले आहे. या कारवाईबाबत आम्ही काही काळ वाट पाहणार आहोत. त्यानंतरही आमच्या मागणीचा विचार केला नाही तर ब्रिगेड पद्धतीने आम्ही बाळासाहेबांचे चित्र हटवू, असे आखरे यांनी सांगितले. यावेळी मुंबई प्रमुख अमोल जाधवराव, मुंबई निरीक्षक सुधीर भोसले, केंद्रीय निरीक्षक सुहास राणे उपस्थित होते.