रामेश्वरम- पामबन रेल्वेपुलाचा थरार जरूर अनुभवा


पर्यटन प्रेमींसाठी प्रवासाचे साधन कोणते असावे याचे खास चॉईस नसतात. आजकाल वेळ वाचविण्यासाठी विमान प्रवासाला प्राधान्य दिले जात असले तरी अवतीभोवतीच्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत केलेले बस अथवा रेल्वे प्रवासही पर्यटनाचा वेगळा आनंद देत असतात. त्यातही ट्रेन प्रवासाची मजा आणखी वेगळी असते. देशातील पवित्र क्षेत्र रामेश्वरमला जाताना लागणारा समुद्रावरचा १०० वर्षांहुनही जुना रेल्वे पुल प्रवासाचा अनोखा थरार व रोमांच अनुभवण्याची संधी नक्कीच देतो इतकेच नव्हे तर पुलावरून जाताना परमेश्वराचे स्मरण करणेही भाग पाडतो. पुलावरून रेल्वे धडाडत जाऊ लागली की नकळतच कांही अपघात होणार नाही ना अशी शंका मनात डोकावल्याशिवाय रहात नाही कारण हा पूल तब्बल २.३ किमी लांबीचा आहे.

देशातील हा सर्वात धोकादायक व एकमेव समुद्र पूल म्हणून ओळखला जातो. तमीळनाडूतील हा पुल रामेश्वरम पासून पामबम बेटाला जातो. निसर्ग आणि तंत्रज्ञानाचा अनोखा मेळ घालून हा पूल ब्रिटीश काळात १८८५ साली बांधायला सुरूवात केली गेली होती. त्यासाठी गुजराथेतील कच्छ भागातून मजूर आले होते. या पुलाचे बांधकाम १९१४ साली पूर्ण झाले व तेव्हपासून हा पूल अव्याहत रेल्वे वाहतूक करतो आहे. त्याकाळातला हा देशातला सर्वाधिक लांबीचा समुद्रपूल होता व म्हणूनच तो ऐतिहासिक महत्त्वाचाही आहे.

आज वयाची शंभरी पार केलेला हा पूल अजूनही जसाच्या तसा आहे. हा पूल मध्येच उघडतोही. या पुलासाठी १४५ काँक्रीट खांब समुद्रात उभे करण्यात आले होते. आजही समुद्राच्या लाटा व वादळांना हा पूल यशस्वीपणे तोंड देत आहे. आता देशातील सर्वात मोठा समुद्र पूल बांद्रा कुर्ला सी लिंक हा आहे.