मी वादग्रस्त होतो तर मला पुरस्कार का दिले?


नवी दिल्ली: बीएसएफ अधिकाऱ्यांवर फेसबूक व्हिडिओच्या माध्यमातून खळबळजनक आरोप करणारा जवान तेज बहादूर यादव यांनी एका वृत्तवाहिनीशी खास बातचीत केली. तेज बहादूर यावेळी म्हणाले की, मी जर चूक आणि बेशिस्त होतो, तर मला पुरस्कार का देण्यात आला होता? बीएसएफचा मी गोल्ड मेडलिस्ट आहे. मला अनेकदा पुरस्कार का देण्यात आले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यासंबंधी आधीही आपण तक्रार केली होती. पण तरीही काहीच कारवाई झाली नाही तेव्हा नाईलाजाने मला हा व्हिडिओ टाकावा लागल्याचे तेज बहादूरने स्पष्ट केले. पुढे तेज बहादूर म्हणाला की, मी माझ्या कंमाडरकडे या प्रकरणी तीन ते चार वेळा तक्रार केली होती. पण तरीही कोणती कारवाई झाली नाही तेव्हा मला हा व्हिडिओ टाकावा लागला. हो मी व्हिडिओ पोस्ट केला. पण सत्य दाखवणे चुकीचे आहे? मी फक्त देशाच्या नागरिकांना सत्य दाखवले आहे. ८०% तक्रारी या तोंडी केल्या जातात. त्यामुळे मी देखील आजवर अशाच प्रकारे तक्रार केली होती.

ज्या ठिकाणी मी होतो तिथे कोणताही मीडिया नाही किंवा इतर साधन नाही. अधिकारीही जेव्हा येतात तेव्हा त्यांना जवानांना भेटण्यात फार रस नसतो. त्यामुळे मी जे काही दाखवले आहे तो ग्राऊंड रिपोर्ट आहे. मी तेच जेवण व्हिडिओमध्ये दाखवले आहे जे मला दिले होते, असे तेज बहादूर म्हणाला. आता मला पोस्टवरुन बटालियन हेडक्वॉर्टरला शिफ्ट केले आहे. माझे कमाडेंटशी बोलणे झाले. तेव्हा त्यांनी मला विचारले की, तुम्ही असे काही केले आहे का?, मी हो म्हटले.