पोटात बोगदा असलेला प्राचीन वृक्ष कोसळला


कॅलिफोनिर्यातील भीषण वादळाने व मुसळधार पावसाने राज्यात अनेक ठिकाणी पूर स्थिती निर्माण केली आहेच पण अनेक वृक्षही उन्मळून पडले आहेत. यंदाच्या वादळाने या भागातील प्राचीन म्हणजे १ हजार वर्षापूर्वीच्या झाडाचाही बळी घेतला आहे. हे झाड नुसते प्राचीन नाही तर या झाडाच्या रूंद खोडातून बोगदा काढून कारसाठी रस्ता बनविला गेला होता व त्यामुळे हे ठिकाण विशेष बनले होते.

कारसाठी रस्ता तयार केला जात असताना हे प्रचंड झाड रस्त्यात मधेच येत होते. १३७ वर्षांपूर्वी हा रस्ता तयार केला गेला तेव्हा झाड तोडण्याऐवजी त्याच्या भल्या मोठ्या रूंद खोडातून कौशल्याने बोगदा तयार केला गेला होता व त्यातून रस्ता बनविला गेला होता. या बोगद्यातून दररोज हजारो कार्स जात येत असत. इतकेच नव्हे तर पर्यटक आणि प्रवासी यांच्यासाठी हा बोगदा मोठे आकर्षण बनला होता. यंदाचे भयानक वादळ हा वृक्ष पेलू शकला नाही.

कॅलिफोर्निया व नेवाडा येथे गेले काही दिवस मुसळधार पाऊस व भयंकर वादळ सुरू आहे त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत बनले आहे.