संशयास्पद मृत्यू


चित्रपट अभिनेता ओम पुरी याच्या निधनाला तीन दिवस झाले मात्र निधनाच्या पहिल्या दिवसापासूनच निधनाच्या कारणाविषयी कुजबुजीच्या स्वरूपात चर्चा सुरू झाली आहे. कोणाच्याही खासगी आयुष्यात डोकावणे योग्य नव्हे परंतु नामवंत चित्रपट अभिनेता आणि वादग्रस्त व्यक्तिमत्त्व यामुळे ओम पुरीच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे आणि ती होणे अपरिहार्य आहे. ओम पुरी यांचे दोन विवाह झालेले आहेत. परंतु दोन्हीही विवाह असफल झाले असल्याने ओम पुरी एकटाच रहात होता. त्याची पहिली पत्नी सीमा कपूर ही चित्रपट अभिनेत्री असून ती त्याच्यापासून आता वेगळी रहात आहे. ओम पुरीची दुसरी पत्नी नंदिता दास हिच्याशीही ओम पुरीचे पटत नसल्यामुळे तिही त्याच्यापासून वेगळीच रहात होती. सीमा कपूरला अपत्य नाही. नंदिता दास हिला मात्र एक मुलगा आहे. पती-पत्नी परस्परापासून वेगळे रहात असल्यामुळे मुलगा पत्नीकडे राहतो. परंतु ओम पुरी नंदिता दास हिच्या उपजीविकेची जबाबदारी घेत होता आणि त्याने नंदिता दासला स्वतंत्र घर घेऊन दिलेले होते. मुलाच्या प्रेमासाठी त्याने हे केले होते.

नंदिता दास ही ओम पुरीच्या अंत्ययात्रेत सहभागी होती आणि तिने ओम पुरीची पहिली पत्नी सीमा कपूर हिला फोन करून अंत्ययात्रेला न येण्याविषयी बजावले होते. नंदिता दास ही एवढेच करून थांबलेली नाही तर अंत्ययात्रेनंतर लगेचच ती ओम पुरी रहात असलेल्या सदनिकेवर गेली आणि तिने ते घर आपल्या जवळच्या किल्लीने उघडले. घरातल्या काही कपाटांना कुलपे लावून त्यांच्या किल्ल्या स्वतःजवळ ठेवून ती निघून गेली. ओम पुरीच्या सरबराईसाठी आणि देखभालीसाठी काही माणसे नोकरीला ठेवली होती. त्यांच्यावर नंदिता दासने जाताना आगपाखड केली. आपल्या नवर्‍याचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला नसून त्याला कोणीतरी मारून टाकले आहे असा तिचा संशय असून त्यादृष्टीने त्या दोघांची नावे घेतली आहेत. त्या दोघांची पोलिसांनी चौकशीसुध्दा केली आहे. त्यातून काय निष्पन्न झाले हे नंतरच उघड होईल. पण पोलीस या संबंधात सावध झाले असून त्यांनी नंदिता दास हिचीही चौकशी करायला सुरूवात केली आहे.

समाजातले मोठे लोक, कलाकार, नेते, उद्योजक हे प्रचंड श्रीमंत असतात आणि ते श्रीमंती थाटात रहात असतात. परंतु दुरून साजरे दिसणारे हे डोंगर जवळून पाहिले असता विद्रुप दिसायला लागतात. आपल्या देशातली जनता प्रसिध्दीच्या झोतातील व्यक्तींना डोक्यावर घेत असते. परंतु अशा लोकांच्या वैयक्तिक जीवनातील असे दोष पाहिले म्हणजे आश्‍चर्य वाटल्याशिवाय रहात नाही.

Leave a Comment