पेट्रोल पंपचालक नमले; कार्डबंदी घेतली मागे


नवी दिल्ली – डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे पेट्रोलपंपांवर होणाऱ्या व्यवहारांवर अधिभार आकारण्याचा निर्णय बॅंकांनी रविवारी रात्री उशिरा मागे घेतल्यामुळे आजपासून कार्ड न स्वीकारण्याचा घेतलेला निर्णयही पेट्रोलपंप चालकांनी मागे घेतला आहे.

पेट्रोलपंप चालकांसाठी बॅंकांनी डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर एक टक्का अधिभार लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी ९ तारखेपासून होणार होती. यामुळे देशभरातील पेट्रोलपंप चालकांनी ९ तारखेपासून डेबिट आणि क्रेडिट कार्ड न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. बॅंकांनी अधिभार आकारण्याचा निर्णय मागे घेतल्याने पेट्रोलपंप चालकांनीही कार्ड न स्वीकारण्याचा निर्णय मागे घेतला आहे. याला ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनीही दुजोरा दिला आहे.

पेट्रोलपंप चालकांना बॅंकांकडून आकारण्यात येत असलेल्या अधिभाराबाबत पुढील काही दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत तेल कंपन्या, पेट्रोलपंप चालक आणि बॅंका या सर्वांशी पेट्रोलियम मंत्रालय चर्चा करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Leave a Comment