२०२० पर्यंत इतिहास जमा होणार डेबिट कार्ड , क्रेडिट कार्ड, एटीएम


मुंबई: देशात डिजीटल वारे नोटबंदीनंतर वेगाने वाहू लागले असून कॅशलेस इकॉनॉमिचा जोरदार आग्रह सरकारनेही धरला आहे. निती आयोगाने याच पार्श्वभूमीवर महत्त्वाचे विधान केले असून २०२० पर्यंत देशातील डेबिट कार्ड , क्रेडिट कार्ड, एटीएम आणि पीओएस मशिन इतिहास जमा होतील असे आशावाद भविष्य निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी म्हटले आहे.

अमिताभ कांत प्रवासी भारतीय संमेलन २०१७ या कार्यक्रमात बोलत होते. कांत यांनी या वेळी बोलताना कॅशलेश व्यवहारांना चालना देण्यासाठी निती आयोगाने महत्त्वाच्या योजना आणल्या असल्याचा दावा केला. तसेच, अर्थविषयक तंत्रज्ञान सामाजिक अविष्कार या बाबतीत भारतात मोठे बदल होत आहेत. या बदलामुळेच भारतात येत्या काळात डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, एटीएम मशीन आणि पीओएस मशीनची गरज उरणार नाही, असे वक्तव्य कांत यांनी केले आहे. आपला देश एकमेव असा देश आहे की जेथे १ अब्ज लोक मोबाईल फोन वापरतात आणि त्यांच्याजवळ बायोमेट्रिक ओळख आहे. मोबाईल फोन आणि भीम अॅपच्या साहाय्याने आपण भविष्यात सर्व व्यवहार करू शकू, असेही कांत या वेळी म्हणाले.