नवज्योतचा पोरखेळ


क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू याच्या मनात आपल्या लोकप्रियतेविषयी भलत्याच भ्रामक कल्पना असाव्यात असे दिसते. पण त्याची स्थिती आता नारायण राणे यांच्यासारखी होणार असे दिसायला लागले आहे. तो भाजपाचा उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेला पण २०१४ साली त्याला भाजपाने उमेदवारी दिली नाही. परिणामी त्याच्या मनात भाजपाविषयी राग जमा होत गेला. त्याने भाजपाला रामराम केला आणि आम आदमी पार्टीत जाण्याचे संकेत दिले. मात्र प्रत्यक्षात त्याच्या राजकारणाने नवेच वळण घेतले. त्याने स्वत:चा प्रादेशिक पक्ष स्थापन केला. तो आता नव्या पक्षाचा नेता असल्याने त्या अधिकारात त्याने आम आदमी पार्टीशी युतीसाठी वाटाघाटी सुरू केल्या. आपने त्याला सत्तेवर आल्यास उपमुख्यमंत्री करण्याची ऑफर दिली पण ती सिद्धुला मान्य नाही.

आता तर त्याने आपला पक्ष सोडून देऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची तयारी सुरू केली असून तो येत्या ९ तारखेला रीतसरपणे कॉंग्रेसवासी होणार आहे. त्याची पत्नी भाजपाची आमदार होती पण ती आपल्या नवर्‍याच्या आधीच कॉंग्रेसमध्ये दाखल झाली आहे. सिद्धु हा स्वत:ला फार लोकप्रिय समजतो आणि आपण ज्या पक्षात जाणार त्या पक्षाला पंजाबात बहुमत मिळणार असे मानून मुख्यमंंत्री होण्याच्या गोष्टी बोलायला लागतो. कॉंग्रेसमध्ये येण्यापूर्वी त्याला कॉंग्रेसने तसे काही आश्‍वासन दिलेले नाही पण तो आणि त्याची पत्नी लोकांना तसे भासवत आहेत. किंबहुना कॉंग्रेसला बहुमत मिळावे म्हणूनच आपल्याला कॉंग्रेसमध्ये घेण्यात आले आहे असे तो मानत आला आहे. कारण तसे भासवले जाणे त्याच्यासाठी आवश्यक आहे. नसता तो कसलेेही आश्‍वासन न घेताच कॉंग्रेसमध्ये गेलाय अशी चर्चा होत राहील.

तो काहीही भासवत असला तरीही कॉंग्रेस तिथे मुख्यमंत्री म्हणून कोणाचेच नाव जाहीर करणार नाही. कॅप्टन अमरिंदर सिंग हे कॉंग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे अघोषित उमेदवार आहेत. तसे जाहीर होत नाही पण त्यांना तशी किंमत दिली जाते कारण पंजाबात कॉंग्रेसला विजय मिळवून देण्याची त्यांच्याइतकी कोणातच क्षमता नाही. आता सिद्धु आपण मुख्यमंत्री होणार असल्याचे भासवून कॉंग्रेसमध्ये येत आहे पण त्यामुळे अमरिंदरसिंग खवळले आहेत. पक्षाने सिद्धूला कसलेही आश्‍वासन दिलेले नाही असा खुलासा त्यांनी केला आहे पण पक्षात अमरिदरसिंग यांचेही काही विरोधक आहेत आणि ते आता सिद्धुच्या भोवती जमा होत आहेत. एकंंदरीत सिद्धू मुख्यमंत्री होणार नाही पण त्याच्या निमित्ताने पक्षात फूट मात्र पडणार आहे.

Leave a Comment