आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेचा शोध लावणाऱ्या सँडफर्ड फ्लेमिंग यांना गुगलचा सलाम


गुगलकडून अनोख्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेचा शोध लावणाऱ्या सँडफर्ड फ्लेमिंग यांना मानवंदना देण्यात आली असून सँडफर्ड फ्लेमिंग यांची आज १९० वी जयंती आहे. गुगलने त्यासाठी त्यांच्या यशाची महती सांगणारे डुडल तयार केले असून वाफेच्या इंजिनासह आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळ दर्शविणारी २४ घड्याळे या डुडलमध्ये दाखविण्यात आली आहेत. स्कॉटिश वंशाचे असणारे सँडफर्ड हे पेशाने डिझायनर होते. सँडफर्ड यांचा जन्म स्कॉटलंडच्या किक्रॅलडी येथे झाला होता. आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेच्या निश्चितीपूर्वी जगाच्या विविध भागांतील लोक सूर्याच्या आकाशातील स्थितीवर स्वत:च्या घड्याळाची वेळ निश्चित करत. मात्र, जेव्हा एखादी ट्रेन एका देशातून दुसऱ्या देशात जात असे तेव्हा वेळेचे गणित बिघडत असे. ही समस्या दूर करण्यासाठी सँडफोर्ड यांनी २४ तासांच्या घड्याळाचा विचार उचलून धरला.

८ फेब्रुवारी १८४७ मध्ये रॉयल कॅनेडियन इन्स्टिट्यूटमध्ये सँडफर्ड यांनी आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेचा सिद्धांत मांडला. त्यांनी यासाठी रेखावृत्तानुसार १५ अंशांच्या फरकाने जगाची २४ भागांमध्ये विभागणी केली. सँडफर्ड यांच्या या सिद्धांतामुळे आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळ निश्चित झाली. याशिवाय, कॅनेडियन पॅसिफिक ही आंतरखंडीय रेल्वे उभारण्यातही सँडफर्ड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच त्यांनी कॅनडाचा पहिला पोस्ट स्टॅम्पचेही डिझायनिंग केले. २२ जुलै १९१५ रोजी सँडफोर्ड यांचे निधन झाले.

Leave a Comment