डाकोटातील अणुबाँब रोधक घरांची वसाहत


आज जगात अण्वस्त्रांसाठी सर्वच देश स्पर्धा करत आहेत. अशा वेळी माणसाने त्याचे अस्तित्त्व टिकून राहावे यासाठी सुरक्षित घरांचा शोध सुरू ठेवला नाही तर नवलच म्हणावे लागेल. वायवोस कंपनीने अशी घरे बांधण्यात पुढाकार घेतला असून पूर्वी लष्करासाठीच वापरल्या जात असलेल्या अमेरिकेतील दक्षिण डाकोटा भागात अणुहल्ल्यापासून तसेच त्सुनामी, भूकंप, रासायनिक हल्ले अशा सर्व संकटांपासून संरक्षण देऊ शकणार्‍या घरांची वसाहत उभी केली आहे. अशी घरे जर्मनी, इंडियाना, युरोपमध्येही बांधली जात आहेत.

ही घरे ८० फूट लांब, २६ फूट रूंद व पाच लाख टन क्षमतेच्या बाँबहल्ल्यालाही तोंड देतील अशी भक्कम आहेत. दिसायला ती बंकर सारखी वाटली तरी आतून अत्यंत आलिशान व अत्याधुनिक आहेत. या एका घरात १० ते २० लोक आरामात राहू शकतात. या वसाहतीत शाळा, कॉलेज, जिम, चर्च, गार्डन, शूटिंग रेंज, थिएटर अशा अत्यावश्यक सर्व सुविधा आहेतच पण १ वर्षासाठी अन्नधान्य साठविण्याची सुविधाही आहे. प्रत्येक घरात होम थिएटर, स्नूकर टेबल, खिडक्यांच्या जागी एलसीडी स्क्रीन अशी सुविधा आहे. स्टील आणि क्राँक्रीटचा वापर करून बांधली गेलेली ही घरे २५ हजार ते २ लाख डॉलर्स किमतीत उपलब्ध आहेत.

दक्षिण डाकोटाच्या या भागात १९४० पासून लष्करी वस्ती होती. येथे शस्त्रास्त्रे, हत्यारे, बाँब ठेवले जात असत. १९६७ पासून ते बंद केले गेले.