कैलास पायथ्याशी असलेले नयनमनोहर मणीमहेश सरोवर


हिमाचल प्रदेशातील पीर पांजाल पर्वतरांगामधील मणीमहेश सरोवर ट्रेकर्सबरोबरच धार्मिक पर्यटनस्थळ म्हणूनही लोकप्रिय ठिकाण आहे. हिंदू संस्कृतीत हे पवित्र सरोवर मानले जाते व वर्षाकाठी हजारो भाविक यात्रेकरू या सरोवरात स्नान करण्यासाठी येथे येत असतात. जन्माष्टमी पासून ते राधा अष्टमी पर्यंत येथे स्नान पर्वणी असते. कैलासाच्या पायथ्याशी असलेले हे सुंदर सरोवर तिबेट मधील मानसरेावरानंतर दोन नंबरचे पवित्र सरोवर मानले जाते.

स्वच्छ चमकदार निळ्याभोर पाण्याचे हे सरोवर चहूबाजूंनी उंच बर्फाळ पर्वतरांगांनी वेढले गेलेले आहे. येथे जाण्यासाठी तट्टे मिळतात. हे सरोवर महादेवाला अर्पित आहे. या सरोवरला जाण्याचा रस्ताही अतिशय नयनरम्य आहे. धरमशाला पासून ट्रेक करूनही येथे जाता येते. व्यावसायिक, नवशिके व हौशी असे सर्व ट्रेकर्स हा ट्रेक सहज करू शकतात. त्यासाठी चार ते पाच दिवस लागतात. धरमशाला पासून दांचो, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स मधून बुधील व्हॅली असा हा ट्रेक आहे. या मार्गावर अनेक प्रकारच्या दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत तसेच हिमनदीही आहे. मे ते आक्टोबर हा काळ येथे जाण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे.

Leave a Comment