पत्रकार दिन – ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन


मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ हे बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले. दिवस बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिनही आहे. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो.

बाळशास्त्री हे इंग्रजी राजवटीतील एक विद्वान व्यक्तिमत्व म्हणून विखय्त होते. बालपणी घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास केलेल्या बाळशास्त्रींनीं सन १८२५ मध्ये मुंबई येथे सदाशिवबापू छत्रे आणि बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडून संस्कृत आणि इंग्रजीचे शिक्षण घेतले. गणित आणि आधुनिक विज्ञान या विषयातही ते पारंगत होते. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी सन १८३४ मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालयात पहिले भारतीय व्याख्याते म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली..

बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या भाषांचे ज्ञान होते. फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या राजाकडून त्यांचा मानसन्मान झाला. त्यांनी प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख व ताम्रपट यांचे शोधनिबंध लिहिले. मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच प्रथम उपलब्ध करून दिली. कुलाबा वेधशाळेच्या संचालकपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली. रसायनशास्त्र , भूगर्भशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, न्यायशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र अशा विविध विषयांचे बाळशास्त्री यांना ज्ञान होते.

एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये अध्यापन करीत असताना समाजाकडे सजगतेने पाहणाऱ्या बाळशास्त्रींना अनेक समस्या दिसून येत. पारतंत्र्य, अनिष्ट रूढी, चालीरीती, अज्ञान, दारिद्र्य, अंध:श्रद्धा होणाऱ्या समाजाच्या अधोगतीमुळे त्यांना चिंता वाटत असे. या सर्व समस्यांमधून मार्ग दाखविण्यासाठी प्रबोधनाची आवश्यकता त्यांना जाणवली. त्यासाठी गोविंद कुंटे आणि भाऊ महाजन यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले.

६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले. त्याचवेळी इंग्रजी सत्ताधाऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पण’मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे. वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने ‘दर्पण’ला सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळाले नाहीत. मात्र ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. ‘दर्पण’ साडे आठ वर्षे चालले आणि जुलै, १८४० मध्ये त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.

‘दर्पण’ या दैनिक वृत्तपत्रासोबत मराठीतील पहिले मासिक ‘दिग्दर्शन’ त्यांनी १८४० साली सुरू केले. त्याचे स्वरूप शैक्षणिक होते. ‘दिग्दर्शन’ मधून ते आधुनिक भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, व्याकरण, गणित तसेच भूगोल व इतिहासावर लेख प्रकाशित करत. भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी हे महारथी त्यांचे विद्यार्थी होते. ‘दिग्दर्शन’च्या कामात त्यांची मदत होती. या मासिकाचे संपादक म्हणून बाळशास्त्रींनी ५ वर्षे काम पाहिले. या मासिकाच्या माध्यमातून त्यांनी लोकांची आकलनक्षमता वाढवण्याचा प्रयत्‍न केला.

Leave a Comment