पंतप्रधान मोदींचा दावा ठरला फोल; बँकेत ९७ टक्के रद्द नोटा जमा


नवी दिल्ली – नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशातील काळा पैसा संपुष्टात येणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला दावा फोल ठरण्याच्या मार्गावर आहे.

न्यूज एजन्सी ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, 8 नोव्हेंबररोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर देशातील पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द बादल ठरल्या आहेत. नोटाबंदीनंतर या जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती.

या अहवालानुसार 30 डिसेंबरपर्यंत बँकांमध्ये सुमारे 97 टक्के जुन्या नोटा जमा झाल्या आहेत. सरकारने दिलेल्या मुदतीत बँकामध्ये एकूण 14.97 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. देशात पाचशे आणि हजार रुपयांच्या एकूण 15.44 लाख कोटी रुपयांच्या नोटा होत्या, ज्या एकूण चलनाच्या सुमारे 86 टक्के होत्या.

दरम्यान, सरकारचा अनुमान होता की नोटाबंदीनंतर बँकांमध्ये सुमारे तीन लाख कोटी रुपये जमा होणार नाहीत. एसबीआयच्या अहवालानुसार नोटाबंदीमुळे देशातील बँकामध्ये 2.5 ते 3 लाख कोटी रुपये जमा न होण्याचा अंदाज होता. नोटाबंदीच्या 50 दिवसानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधीत करताना अनेक घोषणा केल्या. मात्र, बँकेत जमा झालेल्या रक्कमेबाबत चुप्पी साधली होती.

Leave a Comment