एसटी महामंडळात तब्बल १४,२४७ पदांसाठी भरती


मुंबई – नव्या वर्षात राज्य सरकारने बेरोजगार तरुणांना एक आनंदाची बातमी दिली असून एसटी महामंडळ म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये तब्बल १४ हजार २४७ पदांसाठी जम्बो भरती करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. शनिवारी म्हणजेच ७ जानेवारीपासून या भरती प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे.

मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे एसटी महामंडळामध्ये असल्याने सध्याच्या मनुष्यबळावर कामाचा ताण पडतो. त्यामुळे या रिक्त पदांवर भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. चालक, वाहक, लिपिक-टंकलेखक, सहायक आणि पर्यवेक्षक अशा विविध विभागांतील १४ हजार २४७ पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती प्रक्रिया म्हणजे आतापर्यंतची एसटी महामंडळामधील सर्वात मोठी भरती असल्याचे म्हटले जात आहे.

एसटी महामंडळात चालक, वाहक, सहायक आणि पर्यवेक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. विशेषत: कोकणात चालक-वाहकांची अधिक कमतरता असल्याने ही पदे तातडीने भरण्याच्या सुचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिल्या आहेत.

एसटी महामंडळाच्या www.msrtc.gov.in आणि www.msrtcexam.in या वेबसाईटवर या भरतीची सविस्तर जाहिरात ७ जानेवारीपासून उपलब्ध असेल. अर्ज भरण्याची प्रक्रिया १२ जानेवारीपासून सुरु होणार आहे, तर अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३ फेब्रुवारी असणार आहे. अर्ज भरताना अनावधानाने चुकीची किंवा राहून गेलीली माहिती दुरुस्त करण्यासाठी किंवा भरण्यासाठी महामंडळाने ६ ते १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

कोकण विभागासाठी (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर) सर्वाधिक ७ हजार ९२३ चालक, तसेच वाहकांची भरती केली जाणार आहे. राज्याच्या इतर भागांमध्ये २ हजार ५४८ लिपिक, ३ हजार २९३ सहायक आणि ४८३ पर्यवेक्षकांची भरती करण्यात येणार आहे.

Leave a Comment