योग्य कारवाई


तृणमूल कॉंग्रेसचे खासदार आणि या लोकसभेतील गटाचे नेते सुदिप बंदोपाध्याय यांना रोझ व्हॅली चिटफंड घोटाळ्यात सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. गेल्या दोन-तीन वर्षात बंगाल, ओरिसा, बिहार या राज्यांना व्यापून राहिलेल्या शारदा चिटफंड घोटाळ्याची चर्चा काहीशी मंदावत असतानाच हा नवा चिटफंड घोटाळा पुढे आला आहे. साधारणतः ४० ते ६० हजार कोटी रुपयांचा हा घोटाळा असावा असा सीबीआयचा अंदाज आहे. त्यामुळेच काल सीबीआयच्या अधिकार्‍यांनी बंदोपाध्याय यांना चौकशीसाठी आपल्या कार्यालयात बोलावले होते. तीन तास कसून चौकशी झाल्यानंतर चौकशीतल्या काही प्रश्‍नांची उत्तरे समाधानकारकरित्या न आल्यावरून सीबीआयच्या अधिकार्‍यांनी बंदोपाध्याय यांना लगेच अटक केली. रोझ व्हॅली चिटफंड घोटाळ्यात अटकेत असलेले सुदिप बंदोपाध्याय हे तृणमूल कॉंग्रेसचे दुसरे खासदार आहेत.

गेल्याच आठवड्यात तृणमूलचे खासदार तपस पाल यांना याच प्रकरणात अटक झालेली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्याचवेळी बंदोपाध्याय यांना सीबीआयने चौकशीस पाचारण केले होते. परंतु संसदेचे अधिवेशन सुरू असल्याचे कारण सांगून त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्यास नकार दिला. मात्र काल त्यांना उपस्थित रहावेच लागले. त्यांची तीन तासपर्यंत तपासणी झाल्यावर त्यांना अटक करण्यात आली. सध्या तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी या अरविंद केजरीवाल यांच्याप्रमाणेच प्रत्येक गोष्टीत मोदीचा हात असल्याचा आरोप करून काहीही घडले की मोदींवर टीका करायला लागल्या आहेत. तसेच त्यांनी काल मोदी आणि अमित शहा यांनाही अटक करण्यात आली पाहिजे अशी मागणी करत मोदी सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. विरोधी पक्षाच्या कोणाही नेत्याला अटक केली किंवा त्याच्यावर कारवाई केली की त्यांची बदनामी होते. मात्र तिच्यातून सुटका करून घेण्यासाठी असे नेते राज्यकर्त्यांवर सुडाची कारवाई केल्याचा आरोप लावून आपल्या बदनामीने होणारे नुकसान टाळण्याचा प्रयत्न करतात. सीबीआयकडून केली जाणारी अशी कोणतीही कारवाई इतकी गुंतागुंतीची आणि नाजूक असते की तिच्यावर राज्यकर्त्यांनी जाहीरपणे काही चर्चा करावी अशी सोय नसतेच. परिणामी कारवाई सीबीआयची परंतु टीका मात्र राज्यकर्त्यांना सहन करावी लागते. कोणताही राजकीय पक्ष सत्तेवर आल्यानंतर अशी सुडाची कारवाई सहजासहजी करू शकत नाही. हेही लक्षात ठेवले पाहिजे.

कारण थोडासाही पुरावा नसताना सीबीआयच कारवाई करत नाही. ज्याच्यावर कारवाई होते तो कुठेतरी गुंतलेला असतोच. केवळ सूड म्हणून त्याच्यावर कारवाई केली तर ती न्यायालयात टिकत नाही. तेव्हा अशी सुडाच्या भावनेतून अनावश्यक कारवाई केली गेली तर न्यायालयाकडून ताशेरे ऐकावे लागतात. सुदिप बंदोपाध्याय यांच्याविरुध्द काही पुरावे आहेत म्हणून त्यांना या प्रकरणात अटक झालेली आहे. तेव्हा या अटकेनंतर ममता बॅनर्जी यांनी केलेला थयथयाट हा अनावश्यक आणि सर्वथा अतार्किक आहे. रोझ व्हॅली ही कंपनी काजल कुंडू या उद्योगपतीने सुरू केलेली आहे. त्यांनी २० वर्षांपूर्वी ही कंपनी सुरू केली परंतु २००३ साली काजल कुंडू आणि त्यांची पत्नी हे अपघातात ठार झाले आणि कंपनीची सूत्रे गौतम कुंडू यांच्या हातात गेली. त्याही पूर्वी काजल कुंडू यांनी ही कंपनी बरीच वाढवली होती. जवळपास चार राज्यांमध्ये २ लाखांवर एजंट नेमून लोकांकडून पैसा गोळा केला. पैसे गुंतवणार्‍यांना मोठ्या मोबदल्याचे आमिष दाखवले. त्यामुळे जवळपास ४० हजार कोटी रुपये कंपनीकडे जमा झाले. कंपनीने हा पैसा हॉटेल, कापड मिल, हवाई वाहतूक, मद्य निर्मिती, माहिती तंत्रज्ञान कंपनी आणि गृहनिर्माण वित्त संस्था अशा उपक्रमात गुंंतवली.

कंपनीच्या म्हणजे लोकांच्या पैशातून अशा प्रकारचे २२ उद्योग काढण्यात आले आणि लोकांना दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे त्यांच्या पैशाची परतफेड केली नाही. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. लोकांच्या पैशातून कंपन्या उभारताना अनेक अडथळे आले परंतु तृणमूल कॉंग्रेसचे नेते सुदिप बंदोपाध्याय आणि तपस पाल यांच्या सारख्यांची मदत घेऊन सरकारची आपल्यावर वक्रदृष्टी होऊ नये अशी व्यवस्था करण्यात आली. सुदिप बंदोपाध्याय या कंपनीला मिळालेल्या सरकारी पांघरूणाबद्दल अटकेत आहेत. अर्थात कोणताही राजकीय नेता अशा गैरव्यवहारावर पांघरूण घालताना त्याचा मोबदला घेतच असतो आणि त्यातून अशा नेत्यांची उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतापेक्षा अधिक मालमत्ता जमा झालेली असते. अशा मालमत्तेचे स्पष्टीकरण त्यांना देता येत नाही आणि त्यातून ते उघडे पडतात. सुदिप बंदोपाध्याय यांचे असेच झालेले आहे. ते स्वतःला निर्दोष जाहीर करत आहेत. ममता बॅनर्जी तर मोदींनाच दोषी धरत आहेत. मात्र स्वतःचे निर्दोषत्व सिध्द करण्यासाठी सुदिप बंदोपाध्याय यांना तसे पुरावे न्यायालयासमोर सादर करावे लागतील. सुदैवाने आपल्या देशातील न्यायालये अजून तरी स्वायत्त आहेत. तेव्हा बंदोपाध्याय यांच्यावर झालेली कारवाई खरोखरच सुडाच्या भावनेतून झाली असेल तर त्यांना तसे ते सिध्द करावे लागेल. निव्वळ थयथयाट करून भागणार नाही.

Leave a Comment