भूकंप व आग पचवून उभे असलेले प्राचीन पेरिया कोविल शिवमंदिर


तमीळनाडूतील तंजावर येथे असलेले प्राचीन पेरिया कोविल किंवा ब्रिहदीश्वरर शिव मंदिर हे युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेले मंदिर अनेक अर्थांनी खास म्हणावे लागेल. देशातील हे सर्वात उंच शिखर असलेले मंदिर आहेच पण अप्रतिम वास्तूशिल्पासाठीही ते जगभरात प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे सहा मोठे भूकंप व मोठी आग याला तोंड देऊनही हे मंदिर आजही डौलाने भक्कमपणे उभे आहे. हे मंदिर १०१० सालात म्हणजे चोल राजवंशकाळात बांधले गेले आहे म्हणजे ते १००६ वर्षे जुने आहे.

चोल राज्यकर्ता राजाराज चोल पहिला याने बांधलेले हे मंदिर चौल राज्यवंशाच्या वैभवाचे साक्ष देते. या मंदिराचे वास्तूशिल्प एकमेवाद्वितीय असून कावेरी काठी बांधलेले हे मंदिर अनेक अर्थानी वैशिष्ठपूर्ण म्हणावे लागेल. ग्रॅनाईट खडकात बांधलेल्या या मंदिराभोवती तटबंदी आहे. विशेष म्हणजे या परिसरात खडक नाहीत. त्यामुळे मंदिराच्या बांधकामासाठी आणलेले खडक किमान ५० किमी वरून आणले असावेत असे सांगितले जाते. मंदिराचा कळस २१६ फूट उंचीचा असून भारतातीलच नव्हे तर जगातील उंच कळसात एक आहे. मंदिर बांधताना कुठेही सिमेंट चुन्याचा वापर केला गेलेला नाही. इंटरलॉकिक पद्धतीने दगडी चिरे बसविले गेले आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराशी असलेला नंदी १६ फूट लांब,१३ फूट उंचीचा असून एकाच खडकातून कोरलेला आहे.


मंदिरातील शिवलिंगही महाप्रचंड आकाराचे आहे. त्यांची उंची ३.७ मीटर इतकी आहे.
लिंलिगाचे पूर्ण दर्शन दोन मजल्यातून घेता येते. मंदिरात हजारो मूर्ती कोरल्या गेलेल्या आहेत. मंदिर बांधणारा राजा राजाराज हा शिवभक्त होता तसेच महापराक्रमीही होता. संपूर्ण दक्षिण भारतावरच नव्हे तर श्रीलंका, मलाया, मालदीव पर्यंत त्याचे राज्य पसरलेले होते. श्रीलंकेचा राज्याभिषेक त्याला केला गेला होता. त्याला स्वप्तात शिवाने मंदिर बांधण्याचे आदेश दिले व त्यानुसार हे मंदिर बंाधले गेले असे सांगितले जाते. या मंदिरात वेळोवेळी करावयाच्या पूजा, देवाला घालायचे पोशाख, दागदागिने, वापरायची फुले या संदर्भात अनेक नियम राजाने केले होते व ते येथील दगडांत कोरलेले आहेत. चोल घराण्याने अनेक मंदिरे कावेरीकाठी बांधली मात्र हे मंदिर त्या सर्वात खास आहे. येथे पर्यटकांची वर्षभर वर्दळ असते.

Leave a Comment