चीनने व्यापली भारतीय स्मार्टफोनची ४० टक्के बाजारपेठ


नवी दिल्ली – एकीकडे आपल्या देशातील काही देशभक्त चीनमधील वस्तू वापरू नका, स्वदेशी वस्तू वापरा असा प्रचार करत असतानाच भारतीय बाजारपेठेमध्ये वेगळे चित्र पाहायला मिळत असून चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाका असे काही लोक म्हणत होते, परंतु चीनच्या स्मार्टफोनला भारतीयांची पसंती असल्याचे एका सर्व्हेतून समोर आले आहे. भारतीय स्मार्टफोनची मागणी गेल्या काही दिवसांमध्ये घटली असून चीनच्या स्मार्टफोनचा भारतीय बाजारपेठेतील हिस्सा हा ४० टक्के झाला आहे.

स्मार्टफोनसाठी जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ म्हणून भारतीय बाजारपेठ ओळखली जाते. त्यामुळे चीनचा भारतीय बाजारपेठेतील वाढता हिस्सा ही भारतीय निर्मात्यांची डोकेदुखी ठरणार आहे. सर्वाधिक जास्त वाढ ही लिनोव्होच्या स्मार्टफोन्समध्ये पाहायला मिळाली आहे. सॅमसंग या दक्षिण कोरियन कंपनीनंतर लिनोव्होचीच उत्पादने सर्वाधिक विकली गेली असल्याचे इंटरनॅशनल डाटा कॉर्पोरेशनने म्हटले आहे.

याबाबत त्यांनी एक सर्व्हे केला असून त्यानुसार देशात सर्वाधिक विक्री झालेले स्मार्टफोन कोणते, त्यांच्या किमती काय आणि ग्राहकांचा कल याबाबींचा सर्व्हे करण्यात आला आहे. भारतीय बाजारपेठेत विक्रीमध्ये प्रथम क्रमांकावर सॅमसंग, द्वितीय क्रमांकावर लिनोव्हो आहेत. पाठोपाठ शाओमी या कंपनीने भारतीय बाजारपेठ काबीज केली आहे. शाओमीचा भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेमध्ये १०.७ टक्के हिस्सा आहे. चीनमधील उत्पादनांची जर बेरीज केली तर त्यांचा हिस्सा ४० टक्क्यांचे असल्याचे या सर्व्हेत म्हटले आहे. भारतीय स्मार्टफोन कंपन्यांच्या विक्रीत तुलनेनी घट झाली आहे. मायक्रोमॅक्सची भारतीय बाजारपेठेवर मजबूत पकड होती परंतु त्यांच्या विक्रीतही सातत्याने घट झाली आहे. मायक्रोमॅक्सची विक्री १६.७ टक्क्यांनी कमी झाल्याचे या सर्व्हेमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment