एसबीआयने सर्व ई-वॉलेट केले ब्लॉक


नवी दिल्ली – पेटीएम, मोबीक्विक, एअरटेल मनीसह सर्व ई-वॉलेट देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेने अचानक ब्लॉक केल्यामुळे ग्राहकांना स्टेट बँकेच्या नेट बँकींग सेवेद्वारे या वॉलेटमध्ये रोकड वळवता येणार नाहीत. दरम्यान, या ई-वॉलेटमध्ये डेबिट आणि क्रेडिट कार्डांद्वारे पैसे ट्रान्सफर करता येणार आहे. या निर्णयाबाबत स्टेट बँकेने आरबीआयला स्पष्टीकरण दिले आहे. सुरक्षा आणि व्यवसाय हित हा निर्णय घेण्यामागे असल्याचे स्टेट बँकेने रिझर्व्ह बँकेला सांगितले आहे. याबाबत ‘सीएनबीसी आवाज’ने दिलेल्या वृत्तानुसार, ई-वॉलेटना ब्लॉक करण्याच्या निर्णयाबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने स्टेट बँकेकडून खुलासा मागवला होता.

पेटीएमला सुरक्षाविषयक नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे ब्लॉक केले असल्याचे कारण स्टेट बँकेने दिले आहे. अनेक ग्राहकांची फसवणूक झाल्याचे प्रकार उघडकीस आल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. पेटीएम ब्लॉक करण्याचा घेतलेला निर्णय तात्पुरता असून पेटीएमवर घातलेली बंदी सुरक्षेबाबतच्या आढाव्यानंतर किंवा त्यांची पूर्तता केल्यानंतर उठवण्याचा विचार केला जाईल, असेही बँकेकडून सांगण्यात आले आहे. वृत्तानुसार, पेटीएमने सुरक्षाविषयक नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले होते. तसेच या ई-वॉलेटना ब्लॉक करण्यामागे प्रतिस्पर्धी हेही एक कारण आहे. तसेच बँक स्वतः आपल्या एसबीआय बडी या अॅपचे प्रमोशन करण्याच्या तयारीत आहे. आपल्या ग्राहकांनी इतर ई-वॉलेटच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार करू नयेत, असे बँकेला वाटते. दरम्यान, याबाबत पेटीएम आणि एअरटेल मनी यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Leave a Comment