उ. प्र.मध्ये निवडणूक


येत्या ११ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या असून एकूण १६ कोटी मतदार आपले ६९० आमदार निवडणार आहेत. उत्तर प्रदेशामुळे विधानसभा निवडणुकीच्या या फेरीला मोठे व्यापक रूप आले आहे. कारण हे उत्तर प्रदेश हे देशातले सर्वात मोठे राज्य आहे. गेल्या सहा महिन्यापासून या राज्यात निवडणुकीचे नगारे वाजायला सुरूवात झालीच होती. आता तिच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या पाचही राज्यात भाजपाला एक तर पाय रोवायचे आहेत किंवा असलेली सत्ता टिकवायची आहे.

उत्तर प्रदेशात भाजपाने गेल्या लोकसभा निवडणुकीत ८० पैकी ७४ जागा जिंकल्या होत्या आणि त्यामुळेच भाजपाला केंद्रात निर्विवाद स्थान मिळाले. आता होणार्‍या विधानसभा निवडणुकीत भाजपाची तेवढी ताकद दिसते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि तिथली निवडणूकसुध्दा अनेकरंगी परंतु चुरशीची होणार आहे. बसपाच्या नेत्या मायावती या दलित मतांच्या जोरावर ही सत्ता मिळवूही शकतात आणि यावेळीच तर त्यांनी फार परिश्रमपूर्वक आणि अभ्यासपूर्वक जातीय गणिते मांडून निवडणुकीची रणनीती निश्‍चित केलेली आहे. उत्तर प्रदेशातली मुस्लिमांची मते नेमकी कोणाला मिळतात. याला तिथे फार महत्त्व असते. त्यादृष्टीने सपा आणि बसपा यांच्यात चुरस आहे. पण कॉंग्रेसलाही ब्राह्मण आणि मुस्लीम मते मिळून यश मिळण्याची आशा आहे.

पंजाबमध्ये भाजपा आणि अकाली दल यांच्या युतीच्या सरकारला प्रस्थापित विरोधी मतांचा फटका बसेल असा निष्कर्ष मतदारांच्या चाचण्यातून निघालेला आहे. त्यामुळे कॉंग्र्रेसच्या आशा बळावल्या आहेत. सर्वत्र खच्चिकरण होत असलेल्या कॉंग्रेस पक्षाला पंजाबमध्ये विजय मिळवता आला तर कॉंग्रेसचे मनोधैर्य वाढणार आहे. परंतु तिथे अशा चर्चा सुरू असतानाच चंडीगढ महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि तिच्यात कॉंग्रेसला भाजपाने मोठ्या फरकाने पराभूत केले. त्यामुळे मतदारांच्या चाचण्यातून निर्माण झालेले अनुकूल चित्र आणि कॉंग्रेसच्या वाढलेल्या आशा यांच्यावर पाणी फेरले गेले आहे. गोव्याध्ये सध्या भाजपाचे सरकार आहे. परंतु तिथे भारतीय जनता पार्टीला फुटीचे ग्रहण लागले आहे. त्याचा दुष्परिणाम भाजपाला भोगावा लागला. तर आपला फायदा होईल अशा इराद्याने शिवसेनेने तिथे नशीब आजमावून बघण्याचे ठरवले आहे आणि त्यासाठी फुटीर भाजपा गटाशी हात मिळवणी केलेली आहे.

उत्तराखंडातील निवडणूक भाजपासाठी जीवनमरणाची आहे. कारण तिथे भाजपाने पक्षांतराच्या माध्यमातून सत्तांतर घडवण्याचा प्रयत्न केला होता. मणिपूर हे ईशान्य भारतातले छोटे राज्य आहे. आजवर या छोट्या राज्यातील निवडणुकीकडे कोणाचेच लक्ष नसे. आता मात्र भाजपाने आसामची निवडणूक जिंकून तसेच अरुणाचलात हिकमतीने सत्ता मिळवून ईशान्य भारतात पाय रोवायला सुरूवात केली आहे. भाजपाची ही पायरोवणी मणिपूरमध्ये कितपत यशस्वी होते याकडे सर्वांचे लक्ष आहे आणि त्यादृष्टीने मणिपूरची निवडणूक उत्कंठावर्धक ठरणार आहे.

Leave a Comment