राजकीय, आर्थिक घडामोडींनी ‘आयटी’ उद्योगांसमोर आव्हान

माहिती तंत्रज्ञानातील आघाडीच्या उद्योगांचा कर्मचाऱ्यांना इशारा

मुंबई: सध्याच्या काळात जगभरात राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात सुरू असलेली स्थित्यंतरे, घडामोडी आणि वाद यामुळे माहिती तंत्रज्ञान उद्योगांसमोर मोठी आव्हाने उभी असून त्यांना तोंड देण्यासाठी या उद्योगातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी नाविन्यपूर्ण कौशल्य आत्मसात करून सर्वाधिक क्षमतेने काम करणे आवश्यक आहे; असा इशारा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या ‘इन्फोसिस’ आणि ‘विप्रो’ या कंपन्यांच्या वरिष्ठ व्यवस्थापनांनी दिला आहे.

या परिस्थितीत टिकून राहण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल; असे इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांनी कर्मचाऱ्यांना पाठविलेल्या पात्रात नमूद केले आहे. कोणत्याही विशिष्ट घटकाचा उल्लेख न करता; सध्याच्या सामाजिक आणि राजकीय घडामोडी वैश्विक स्वरूप प्राप्त केलेल्या माहिती तंत्रज्ञान उद्योगाला घटक असल्याचे विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी नमूद केले आहे.

विदेशी ग्राहकांनी खर्चात कपात केल्याने आशियातील सर्वात मोठ्या माहिती तंत्रज्ञान उद्योग असलेल्या ‘टाटा कन्सल्टन्सी’ला मोठा फटका बसला आहे. आर्थिक मुद्द्यांवरून युरोपियन युनियनमधून बाहेर पडलेला ब्रिटन यापुढे माहिती तंत्रज्ञान उद्योगांशी संबंधित कामे इतर देशांकडून करून घेण्याबाबत अनिश्चितता आहे. तसेच अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे इतर देशांमधून माहिती तंत्रज्ञान उद्योगात काम करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निर्बंध लादण्याचे निर्देश दिले आहेत. टाटा कन्सल्टन्सी आणि विप्रोच्या विदेशातील कामांची मदार सर्वस्वी भारतीय कुशल मनुष्यबळावर आहे.

भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या निर्यातीपासून मिळणाऱ्या १० हजार ८०० कोटी रुपयांच्या महसुलापैकी ४/५ महसूल या दोन देशांमधून मिळत आहे. भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगांची नियामक संस्था असलेल्या ‘नॅसकॉम’ने मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीही महसूल प्राप्तीत उद्योगाची पीछेहाट होण्याची शक्यता वर्तविली आहे.

Leave a Comment