मोदींचा ‘मित्रों’ शब्द ट्रेंडमध्ये


मुंबई – कंपन्यांकडून नवनवीन ऑफर्सची घोषणा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी होत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘मित्रों’ शब्द सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यामध्ये फारच ट्रेंडमध्ये असल्याचे दिसत असून अशीच एक आकर्षक ऑफर प्रसिद्ध डिजिटल वॉलेट मोबिक्विकने ग्राहकांसाठी जाहीर केली असून यामध्ये ‘Mitron’ कोडचा वापर करताच १०० टक्के कॅशबॅक मिळणार आहे. ‘मित्रों’ या हाकेचा प्रोमोकोड नुकताच मोबिक्विकने जाहीर केला आहे. पण या ऑफरमध्ये एक अट असून ज्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात ‘मित्रों’ शब्द वापरतील त्याचदिवशी हा कोड वापरता येणार आहे.

नववर्षाच्या पुर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करत केलेल्या भाषणात एकदाही मित्रोंचा उच्चार केला नाही. त्यानंतर सोशल मीडियावर यावरुन आश्चर्य व्यक्त होऊ लागले. एवढेच काय एका बारने तर मोदी जितक्या वेळा मित्रों म्हणतील तितक्या वेळा फक्त ३१ रुपयांच बिअर देण्याची घोषणाच करुन टाकली होती. पण कोणालाही या ऑफरचा फायदा झाला नाही ही गोष्ट वेगळी.

कॅशलेस आणि डिजिटल व्यवहारावर भर देण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यापासून डिजिटल वॉलेटच्या वापरामध्ये वाढ झाली आहे. याचाच फायदा मोबिक्विकने घेण्याचा ठरवत ही ऑफर जाहीर केली आहे. मोबिक्विकवरुन कोणताही व्यवहार केल्यास त्यावर १००टक्के कॅशबॅक देण्यात येईल. या ऑफर अंतर्गत जास्तीत जास्त १०० रुपयांचा कॅशबॅक देण्यात येणार आहे. कमीत कमी १० रुपयांच्या रिचार्जसाठी हा कोड वापरता येईल. मोबिक्विकची ही ऑफर ३१ जानेवारी २०१७पर्यंत वैध असेल. तसेच एका नंबरवरुन हा कोड एकदाच वापरता येईल.

Leave a Comment