ज्ञानाई सावित्रीबाई फुले यांना गुगलची आदरांजली


मुंबई: आज भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी, स्फुर्तीनायिका आणि भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची १८६वी जयंती आहे. इंटरनेट जगतातील सर्वात मोठे सर्च इंजिन गूगलनेही त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना डूडल बनवून आदरांजली वाहिली आहे. आजचे गुगड डूडल हे लक्षवेधी ठरले असून, त्यात सावित्रीबाई फुले अनेक महिलांना आपल्या पदराखाली घेताना दिसत आहे.

सावित्रीबाई फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांना शिक्षण देण्यासाठी अर्पण केले. ब्रिटीश राजवटीत अपवाद वगळता संपूर्ण देश निरक्षर होता. त्यातच पूरूषप्रधान संस्कृती असल्याने महिलांच्या अज्ञान आणि अशिक्षीतपणाला तर अंतच नव्हता. अशा स्थितीत स्त्रियांना एकत्र करणे आणि शिक्षीत करणे ही प्रचंड मोठी आणि तितकीच नवी गोष्ट होती. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगांव येथे सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१मध्ये झाला. त्यांचा विवाह जोतिबा फुले यांच्याशी झाला. जोतिबा फुले हेसुद्ध महान क्रांतीकारक आणि समाजसुधारक होते. त्यांच्या कार्याने प्रभावी होऊन त्यांना जनतेने महात्मा ही पदवी दिली. सावित्रीबाईंच्या कार्यात आणि जिवनात जोतिबा फुलेंचे मोठे योगदान आहे. मुळात जोतिबांनीच त्यांना शिक्षणाची गोडी लावली आणि शिक्षीकाही बनवले. पुण्यातील फुले वाडा आजही या दोन क्रांतीकारकांच्या कार्याचे साक्षीस्थळ आहे.

सावित्रीबाईंना सामाजिक आणि स्त्रीशिक्षणाचे कार्य करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. या अडचणी निसर्गत: मुळीच नव्हत्या. समाजातीलच काही दांभीक लोकांनी सत्ता आणि स्वार्थासाठी सावित्रीबाईंना विरोध केला. १८४८ मध्ये त्यांनी भारतातील पहिली महिला शाळा पुणे येथे सुरू केली. त्याला बालिका विद्यालय असे नाव दिले. पूढे त्यांनी आपल्या मेहनत आणि चिकाटीच्या बळावर १८ महिला शाळा सुरू केल्या. तसेच, आपले संपूर्ण शिक्षण महिलांचे आयुष्य सुखकर करण्यासाठी वाहिले. आज अनेक क्षेत्रात महत्वाच्या पदावर भारतीय महिला जगभर काम करताना दिसतात. भारतातही लाखो मुली शिक्षण घेत आहेत. तितक्याच स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. आज अनेकिंना माहितीही नाही की, त्यांच्या शिक्षणाचे मुळ कोठे आहे. त्या कालात हाल अपेष्ठ सहन करून सावित्रीबाईंनी स्त्रिशिक्षण सुरू केले म्हणूनच महिलांना आज हे दिवस दिसत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन देशभर आणि जगभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुगलनेही डूडल बनवून त्यांना सलाम केला आहे.

Leave a Comment