जिभेसाठी ९ कोटींचा विमा


कारचा विमा, दागदागिन्यांचा, घराचा विमा आणि जीवनविमा आपल्याला नवीन नाहीत. आरोग्य विमाही आता चांगलाच रूळला आहे. अनेक सेलिब्रिटी शरीराच्या विविध अवयवांचेही विमे उतरवितात. कुणी पायांचा, गायक गळ्याचा, आवाजाचा, डोळ्यांचा विमा उतरविल्याचेही अनेक प्रकार आहेत. चवीची जाणीव करून देणार्‍या जीभेच्या विमा उतरविल्याचे मात्र आपल्या ऐकिवात येत नाही. कॅडबरी चॉकलेटच्या स्वादाची पारख करणारी हायलेई कर्टिस या तरूणीच्या जिभेचा विमा उतरविला गेला असून त्यासाठी ९ कोटी रूपये या जिभेची किंमत केली गेली आहे.

आपल्याला हे माहिती आहे की अल्कोहोल, चहा यांच्या टेस्ट घेण्यासाठी विशेष टेस्टर नेमले जातात. त्यांना भरभक्कम पगारही दिले जातात. त्याचप्रमाणे कॅडबरीने त्यांच्या विविध चॉकलेट स्वादाच्या टेस्ट करण्यासाठी ३०० टेस्टरची टीम तयार केली आहे. कर्टिस त्यातील एक आहे. चॉकलेटचा परफेक्ट स्वाद चाखण्याचे महत्त्वाचे काम ती करते. यासाठी तिच्या जिभेवरील टेस्ट बड्स म्हणजेच हे स्वाद इंद्रिय कायम सुस्थितीत असणे आवश्यक आहे. यासाठी कंपनीने तिच्या जिभेची किंमत १० लाख पौंड म्हणजे अंदाजे ९ कोटी रूपये केली असून त्या किंमतीचा विमा उतरविला आहे.