हॉटेलचे सेवाकर देणे ग्राहकांच्या मनावर


नवी दिल्ली – सरकारकडून आज चलनटंचाईच्या समस्येमुळे हैराण झालेल्या सामान्य लोकांना खूश करणाऱ्या घोषणांच्या मालिकेतील आणखी एक निर्णय जाहीर करण्यात आला असून आगामी काळात या निर्णयानुसार हॉटेलच्या बिलावर सेवाशुल्क देणे ऐच्छिक असणार आहे. त्यामुळे हॉटेलच्या बिलावर सेवाशुल्क भरायचे किंवा नाही, हा निर्णय सर्वस्वी ग्राहकांचा असेल. यासंबंधी राज्य सरकारांना केंद्रीय ग्राहक कामकाज खात्याने सूचना दिल्या आहेत. या सूचनेनुसार हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सेवाशुल्क ऐच्छिक आहे, याबाबतची माहिती देणे अपेक्षित आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी नववर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या भाषणातही देशातील जनतेसाठी आकर्षक योजनांची घोषणा केली होती. यावेळी मोदींनी गरीब, वंचित, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर सवलतींची खैरात केली होती. यामध्ये ग्रामीण परिसरांतील घरबांधणीच्या कर्जावर काही व्याज माफ केले जाईल, लघू आणि मध्यम उद्योगांना अधिक स्वस्तात कर्जे मिळतील, गर्भवती महिलांना अनुदान मिळेल, दुकानदारांना बँका सुलभ पतपुरवठा अशा घोषणांचा समावेश होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ३१ डिसेंबरच्या रात्री उद्देशून केलेल्या भाषणादरम्यान, बँकांनी गरीब व कनिष्ठ मध्यमवर्गीयांकडे विशेष लक्ष पुरवून त्यांना स्वस्तात कर्जे कशी मिळतील या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाला तातडीने प्रतिसाद देत भारतीय स्टेट बँकेने रविवारपासूनच आपल्या व्याजदरात ०.९ टक्के कपात करत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता स्टेट बँकेच्या कर्जावरील व्याजदर ८ टक्के एवढा असेल. ही योजना एक वर्ष मुदतीसाठी असेल.

Leave a Comment