‘भीम ऍप’ गुगल प्लेवर अल्पावधीत सर्वाधिक लोकप्रिय


नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी ‘भीम ऍप’ची घोषणा केल्यानंतर अवघ्या ४८ तासात हे ऍप गुगल प्ले स्टोअर्सवरून सर्वाधिक मोफत डाऊनलोड होणाऱ्या ऍपमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. डाऊनलोडसमध्ये याची संख्या फार मोठी नसली तरी ‘रिव्ह्यूज’मध्ये तब्बल ८६ हजार ३५७ जणांनी या ऍपबद्दल आपले मत व्यक्त केले असून त्यापैकी ५८ हजार जणांनी त्याचे कौतुक केले आहे.

बँक खात्याशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावरून सुलभ आर्थिक व्यवहार करणे या ऍपमुले शक्य होणार आहे. गुगल ऍपवर तब्बल ५७ हजार ७१३ जणांनी या ऍपला ५ स्टार दिले आहेत. ९ हजार ८५ जणांनी ४ स्टार, ४ हजार ८०८ जणांनी ३ स्टार, ३ हजार ६६२ जणांनी २ स्टार दिले आहेत. या ऍपला केवळ १ स्टार देणाऱ्यांची संख्याही ११ हजार ८९ आहे.

सध्या ‘भीम’ केवळ अँड्रॉइडवर उपलब्ध असले तरी लवकरच ते ऍपलवर उपलब्ध असणार आहे. कालांतराने इंटरनेट नसलेल्या मोबाईलवरूनही हे ऍप वापरता येणार आहे. या ऍपद्वारे सुलभपणे व्यवहार करणे शक्य असल्याने त्याला मोठा प्रतिसाद मिळेल; अशी अपेक्षा आहे. मात्र त्यामुळे डेबिट कार्डांच्या व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment