नोटबंदीच्या ४८ तासांत विकले गेले १२५० कोटींहून अधिक रुपयांचे सोने


नवी दिल्ली: नोटबंदीचा अचानक जाहीर झालेल्या निर्णयाचा धसका घेऊन अनेकांनी आपल्याजवळील पैशांनी सोन्याची खरेदी केली. नोटबंदीचा निर्णय आठ नोव्हेंबर या दिवशी जाहीर झाल्यानंतर केवळ ४८ तासात तब्बल ४ टन सोन्याची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. विक्री झालेल्या सोन्याची एकूण किंमत १२५० कोटींहून अधिक असून ही माहिती डायरेक्टरेट ऑफ सेंट्रल एक्साईज इंटेलिजन्सने (डीजीसीईआय) केलेल्या सर्वेक्षणात पुढे आली आहे. एवढ्या कमी काळात मोठ्या प्रमाणावर सोने विक्री झाल्याची ही बहूदा पहिलीच घटना असावी. या खरेदी विक्रीतच अनेकांनी आपला काळा पैसा पांढरा केल्याचा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आहे.

नोटबंदीनंतर झालेल्या सोनेविक्रीचे आकडे पाहिले तर, सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होतील अशी स्थिती आहे. दिल्लीतील एका ज्वेलर्समध्ये एका दिवसात तब्बल २०० किलो सोने विक्री झाल्याची धक्कादायक माहिती आहे. यात विशेष असे की, ही विक्री झाल्याच्या अगोदरच्या दिवशीच्या विक्रीचा आकडा पहाल तर आश्चर्याने थक्क व्हाल. २०० किलो सोनेविक्री झाल्याच्या आदल्या दिवशी याच ज्वेलर्समध्ये केवळ ४० ग्रॅम ऐवढी विक्री झाल्याचे सांगितले जात आहे. देशभरातील सोन्याच्या व्यापाऱ्यांकडे चौकशी केली असता आतापर्यंत ४०० सोनारांनी २० कोटींची करचोरी केल्याची माहिती समोर येत आहे. अद्याप ही चौकशी पूर्ण व्हायची असून चौकशी पूर्ण होईपर्यंत हा आकडा १०० कोटींच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे.

Leave a Comment