आता यादवीतले नाट्य संपले


गेल्या काही दिवसांपासून समाजवादी पार्टीत सुरू असलेल्या धुसफुशीचा एकेक पदर आता उलगडायला लागला आहे. अखिलेश यादव यांनी आपल्या वडलांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून बडतर्फ केले असून आपल्या वडलांच्या आवडत्या नेत्यांनाही पक्षातून काढले आहे. शेवटी हा पक्ष मुलायमसिंग यांनी उभारलेला असल्याने अखिलेश यांनी त्यांना पक्षाचे सल्लागार म्हणून पक्षात ठेवले आहे. गेल्या दोन दिवसांत या दोघांत झडलेल्या संघर्षात अखिलेश यादव हे आता उत्तर प्रदेशातले सर्व जाती धर्माचा पाठींबा असलेले नेते म्हणून उदयास आले आहेत. गेल्या पाच वर्षात त्यांनी भ्रष्टाचारमुक्त कारभार केला आहे. नरेन्द्र मोदी गेल्या दोन तीन वर्षात आपल्या एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही ही गोष्ट अभिमानाने सांगतात तसाच प्रकार अखिलेश यादव यांच्या बाबतीत घडला आहे.

कालच्या संघर्षात असेही दिसून आले की, तरुणांमध्ये अखिलेश लोकप्रिय आहेत. शिवाय त्यांना मिळालेला पाठींबा हा सार्‍या समाजघटकांतून आलेला आहे. तो मुलायमसिंग यांच्या प्रमाणे केवळ यादव आणि मुस्लिम यांचा नाही. आपली ही प्रतिमा अखिलेश यांनी घडवली आहे आणि आपली छबी विकासाला वाहिलेला नेता अशी जाणीवपूर्वक तयार केली आहे. त्यातून निर्माण झालेल्या आत्मविश्‍वास त्यांना ते मुलायमसिंग यांच्या पेक्षा ताकदवान नेता झालो आहोत हे दाखवून देण्यास प्रोत्साहित करीत आहे. सतत त्यांच्या मागे उभे राहिलेले त्यांचे काका रामगोपाल यादव यांनीही काल ही बाब सूचित केली होती. यादव जातीच्या बाहेरच्या जातींचा पाठींबा हवा असल्यास मुलायमसिंग यांना आपणच हवे असतो असे ते म्हणाले होते. याचा अर्थ अखिलेश आणि रामगोपाल यांनी व्यापक जनसमर्थन प्राप्त केलेले आहे.

असा हा पाठींबा असला तरीही अखिलेेश यांना आपल्या वडलांच्या यादव समाजातल्या वजनाचाही फायदा घ्यायचा आहे. वडलांना डावलून राजकारण करायला लागलो तर आपल्याला यादव समाजाचे समर्थन गमवावे लागेल याची त्यांनाही जाणीव आहे. अर्थात यातून पडणार्‍या फुटीचा फायदा आपल्याला होईल अशी आशा मायावती यांना आहे. समाजवादी पार्टीची मुस्लिम मते आपल्याला मिळतील अशी त्यांची कल्पना आहे. पण या दोघांच्या ओढाताणीत मुस्लिम मतदार संभ्रमित झाले तर त्यातून त्यांची मते दोन्ही पक्षांना विभागून जातील आणि त्याचा लाभ आपल्याला होईल असे भाजपा नेत्यांना वाटत आहे.

Leave a Comment