ही मुलगी असेल मंगळावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती


ज्या वयात मुले-मुली शालांत परीक्षेची तयारी करतात, त्या वयात अमेरिकेतील एक मुलगी मंगळावर पाऊल ठेवण्याची तयारी करत आहे. त्या ग्रहावर जाणारी ती पहिली व्यक्ती ठरणार आहे.

लुईसियाना येथील बॅटन रूज येथील 15 वर्षीय एलिसा कार्सन ही अंतराळवीरांचे प्रशिक्षण घेत आहे. बॅटन रूज इंटरनॅशनल स्कूलमध्ये ती दहावीत शिकते.मंगळ ग्रहावरील वातावरणाला अनुकूल ठरण्याशी संबंधित अनेक प्रकारचे खडतर प्रशिक्षण घेतले आहे. एकदा मंगळावर गेल्यानंतर पृथ्वीवर परतणे कदाचित शक्य होणार नाही, हे एलिसाला चांगलेच माहीत आहे. मात्र पृथ्वीपासून सुमारे 40 कोटी किलोमीटर दूर मंगळावर जाण्याची तिची जिद्द अढळ आहे. एलिसाने ”नासा”च्या जगभरातील सर्व अंतराळ केंद्रात प्रशिक्षण घेतले आहे. ‘नासा’चा पासपोर्ट प्रोग्राम पूर्ण करणारी ती पहिलीच व्यक्ती ठरली आहे.

वयाच्या तिसऱ्या वर्षी आपले वडील बर्ट कार्सन यांनी एलिसाने “मंगळावर कोणी गेले आहे का” हा प्रश्न केला होता. तिच्या वडिलांनी नाही असे सांगितल्यावर एलिसाने मंगळावर जाण्याचा ध्यास घेतला. एलिसाला इंग्रजी,फ्रेंच, स्पॅनिश आणि चीनी भाषा अस्खलितपणे येतात. विशेष म्हणजे तिला हिंदी शिकण्याचीही इच्छा आहे. “मंगळावरील भारताची ऐतिहासिक मोहीम आणि अंतराळातील त्याचे महत्त्व यांमुळे मी लवकरच हिंदीचे धडे घेणार आहे. माझ्या मंगळावरील मोहिमेबाबत बोलण्यासाठी भारतातून मला आमंत्रण येईल, त्या दिवशाची मी वाट पाहत आहे. तो माझ्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा क्षण असेल,” असे तिने युएनआयला सांगितले.

वर्ष 2027 मध्ये मंगळावर मनुष्यांची वस्ती बसविण्याच्या दृष्टीने ‘मार्स वन’ नावाची संस्था प्रयत्न करत आहे. एलिसा ही याच संस्थेची अॅम्बेसडर आहे. “मंगळावर ऑक्सिजन अत्यंत कमी आहे. तिथे 95 टक्के कार्बन डाय ऑक्साईड आहे. त्यामुळे मला कमी ऑक्सिजनमध्ये राहण्याचेही प्रशिक्षण देण्यात आले आहे. अंतराळ केंद्रातील प्रशिक्षणादरम्यान माझ्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी करण्यात आले. त्यावेळी माझ्यात ‘यूफोरिया’ची लक्षणे दिसली. म्हणजेच तुम्ही खूप हसता आणि गप्प बसणे अवघड बनते. माझे पूर्ण शरीर सुन्न झाले. हा खूपच रंजक अनुभव होता.”

Leave a Comment