केरळमध्ये केवळ तृतीयपंथीयांसाठी शाळा


केरळमध्ये सहज अल्टरनेट लर्निंग सेंटर या नावाची एक शाळा सुरू झाली आहे. तिचे वैशिष्ट्य हे आहे, की येथे तृतीयपंथीय विद्यार्थी शिकणार आहेत. सुरूवातीला येथे 10 तृतीयपंथीय विद्यार्थी असतील. केरळमधील सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवक त्यांनी शिकवणार आहेत.

“वाईट वागणूक मिळाल्यामुळे ज्यांनी शाळा सोडली किंवा ज्यांना कुटुंबाने वा शाळेच्या अधिकाऱ्यांनी शाळेतून काढून टाकले, अशा तृतीयपंथीय विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र आहे,” असे या शाळेची स्थापना करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या विजयराजा मल्लिका म्हणतात. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सामाजिक अन्याय सहन करणाऱ्या तृतीयपंथीयांचे आयुष्य सहज बनविणे, हे या केंद्राचे उद्दिष्ट आहे. “आम्ही त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करू. संपूर्ण शिक्षण आणि कौशल्याद्वारे त्यांना समाजाचा भाग बनवू. ते नोकरीही करू शकतील आणि स्वतंत्र आयुष्यही जगू शकतील,” असे मल्लिका म्हणाल्या.

भारतात सुमारे 20 लाख तृतीयपंथीय आहेत. तृतीयपंथीयांनाही इतरांएवढेच कायदेशीर अधिकार आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने 2014 साली दिलेल्या निर्णयाद्वारे स्पष्ट केले होते. न्यायालयाने त्यांना तिसऱ्या लिंगाचा कायदेशीर दर्जाही दिला. तसेच, तृतीयपंथीयांना विवाह आणि आणि पैतृक संपत्तीचा अधिकारही देण्यात आला. नोकरी आणि शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळण्यास ते पात्र असल्याचे ठरवण्यात आले.

मात्र साधारणतः तृतीयपंथीयांना भेदभावाला तोंड द्यावे लागते. विजयराजा मल्लिका यांनी केरळमध्ये केंद्र सुरू करण्यासाठी जमीन विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा 50 पेक्षा अधिक लोकांनी त्यांना भूखंड देण्यास नकार दिला, अशी माहिती त्यांनी दिली.

Leave a Comment