समाजवादी दुफळी


उत्तर प्रदेशातली विधानसभा निवडणूक जशी जवळ येत आहे तशी समाजवादी पार्टीतली दुफळी तीव्र होत चालली आहे. तशी अपेक्षाच होती कारण पक्षातले मतभेद मिटले असल्याचे जाहीर करण्यात आले असले तरीही उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर हा मनमुटाव बिघडणारच होता. शेवटी भांडणाचा मुख्य मुद्दा निवडणूक, सत्ता, प्रतिष्ठा आणि त्या पाठोपाठ येणारा पैसा हाच आहे. गेल्या महिन्यात या पक्षात संस्थापक मुलायमसिंग यादव आणि त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यात मोठा संघर्ष झाला. पक्षातले बरेच आमदार आणि तरुण कार्यकर्ते अखिलेश यादव यांच्या मागे आहेत तर जुने जाणते कार्यकर्ते मुलायमसिंगांच्या पाठीशी आहेत. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी काही मंत्र्यांना बडतर्फ करणे, कोणाला तरी पक्षातून बाहेर काढणे असे प्रकार घडले. शेवटी हे घरातले भांडण होते आणि घरातली भांडणे ही अंतिमत: वाटणीसाठी असतात. त्यामुळे वाटणीचे वाद संपले की एकमत झाले आणि सर्वांनी आता एकदिलाने नांदायचे असे ठरले. वादावर पडदा पडला असल्याचे जाहीर झाले.

एकदिलाच्या कितीही गप्पा मारल्या तरी बाप लेकांच्या मनात परस्परांविषयी किल्मिश आहे ते काही कमी व्हायला तयार नाही. ते उमेदवारांच्या यादीवरून जाहीर झालेच. मुलायमसिंग यांनी अखिलेश यादव यांना विश्‍वासात न घेता ३२५ उमेदवारांची यादी जाहीर केेली. अखिलेश यांच्यात आणि ज्या काकांच्यात विस्तव आडवा जात नाही ते काका या यादीच्या प्रकटीकरणाच्या वेळी उपस्थित होते. याचा अर्थ ही यादी अखिलेश यांना केवळ विश्‍वासात न घेताच तयार करण्यात आली आहे असे नाही तर त्यांना अंधारात ठेवून करण्यात आली आहे. या पलीकडे जाऊन असेही म्हणता येते की ही यादी अखिलेश यादव यांच्या विरोधात जाऊन करण्यात आली आहे. त्यामुळे या यादीची त्यांच्या गटात फारच तीव्र प्रतिक्रिया उमटली. ती एवढी तीव्र होती की या विषयावरून आता पक्षात सरळ सरळ दोन गटच नाही तर दोन पक्ष वेगळे होतात की काय असे वाटायला लागले. यादीच्या दुसर्‍या दिवशी अखिलेश यांच्या घरासमोर त्यांचे आणि शिवपाल यादव यांच्या घरासमोर त्यांचे कार्यकर्ते जमले. अखिलेश यांच्या ज्या चाहत्यांना तिकिटे मिळाली नाहीत त्यांनी संताप व्यक्त केला. त्यात ५० विद्यमान आमदार आहेत. साधारणत: कोणत्याही राजकीय पक्षाची उमेदवारीची यादी जाहीर करताना विद्यमान आमदारांना काही सबळ कारण असल्याशिवाय डावलले जात नाही. पण या ५० आमदारांना ते अखिलेश गटाचे आहेत म्हणून डावलले गेले आहे.

अखिलेश यांनी या सर्वांना आपापल्या मतदारसंघात जायला आणि निवडणुकीचा प्रचार करायला सांगितले आहे. ते लोक तसे करतीलही पण दरम्यान मुलायमसिंग यांनी आपण जाहीर केलेल्या यादीत एकही बदल होणार नाही असे निक्षुन सांगितले आहे. कोेणत्याही स्थितीत अखिलेश यादव यांचे वर्चस्व पक्षात निर्माण होऊ द्यायचे नाही असा नेताजींचा निर्धार आहे. तेव्हा अखिलेश यादव यांना माघार घ्यावी लागेल. नसता त्यांच्या मनाप्रमाणे त्यांचे उमेदवार निवडले तर आपला मुलगा मोठा होऊन आपल्यालाच पक्षातून काढून टाकेल अशी भीती नेताजींना वाटते. म्हणून ते यादीत बदल करणार नाहीत आणि अखिलेश आपल्या चाहत्यांना सोडणार नाहीत. म्हणजे उत्तर प्रदेशातल्या किमान १०० मतदारसंघात या दोघांचे पाठीराखे एकमेकांचा पराभव करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसेल. पुरता समाजवादी गोंधळ माजेल. हे अटळ आहे. आपल्या रक्ताने, घामाने आणि कष्टाने मोठा झालेला आपला हा पक्ष आपल्याच कलाने चालेल, त्यावर अन्य कोणाचेही वर्चस्व असता कामा नये असा नेताजींचा पण आहे.

शेवटी हे भांडण आहे तरी काय ? मुलायमसिंग जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी गँगस्टर्स, माफिया आणि गुंड यांना नेहमीच खुली छुट दिलेली आहे. त्यामुळे बिहारात लालू म्हणजे जंगलराज आणि उत्तर प्रदेशात मुलायमसिंग म्हणजे गुंडाराज असे समीकरण मांडले जाते. अखिलेश यादव यांना मात्र आपले सारे राजकीय करीयर करताना आपली प्रतिमा आपल्या वडिलांपेक्षा वेगळी हवी आहे. त्याला अटलबिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणे आपली प्रतिमा वाईट पक्षातला चांगला नेता अशी करायची आहे. यातून हा सारा संघर्ष निर्माण झालेला आहे. आज अखिलेश समोर नितीशकुमार यांचा आदर्श आहे. नितीशकुमार यांनी कॉंग्रेसशी युती करून मोदीविरोधी मतांची जोडणी केली तशी आपणही राहुल गांधी यांच्याशी युती करून राज्यातला आपला टक्का वाढवावा अशी अखिलेश यांची इच्छा होती पण मुलायमसिंग यांनी त्याला सुरूंग लावला. त्यांनी आपला पक्ष कोणाशीही युती करणार नाही असे जाहीर करून टाकले आहे. अखिलेश यादव जे काही करतील त्याच्या विरोधात काही तरी करीत राहणे हा मुलायमसिंग यांना बाणा आहे. त्यातूनच त्यांनी आपल्या पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आधी जाहीर होणार नाही असे म्हणून याही बाबतीत आपल्या मुलाच्या महात्वाकांक्षेवर पाणी फेरले आहे. सारा रागरंग पाहता समाजवादी पक्षात फूट पडण्याची दाट शक्यता आहे.

Leave a Comment