नोटाबंदीचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होतील – उर्जित पटेल


नवी दिल्ली – रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी नोटाबंदीचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होतील, असे म्हटले आहे. लोकांना नोटाबंदीच्या निर्णयामुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेला येत्या काळात या निर्णयाचा मोठा फायदा होईल, असे उर्जित पटेल यांनी म्हटले आहे.

येत्या काळात पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याचे परिणाम दिसून येतील. अर्थव्यवस्था या निर्णयामुळे पूर्णपणे बदलू शकते. कॅशलेस व्यवहारांकडे लोक वळत असल्याने पुढील काळात अर्थव्यवस्था जास्तीत जास्त पारदर्शक होईल, असा विश्वास उर्जित पटेल यांनी व्यक्त केला. सहामाही आर्थिक स्थिरतेचा अहवाल सादर करतेवेळी उर्जित पटेल बोलत होते.

उर्जित पटेल यांनी नोटाबंदीमुळे लोकांना त्रास होत असल्याची बाब मान्य केली. अर्थव्यवस्थेवर जीएसटीचादेखील व्यापक परिणाम होईल. सकल घरेलू उत्पन्न अद्याप स्थिर आहे. महागाई दर नियंत्रणात असल्याचे उर्जित पटेल यांनी सांगितले. मात्र विकास दरावर परिणाम झाल्याची कबुलीदेखील उर्जित पटेल यांनी दिली आहे.

आंतरराष्ट्रीय मानकांनुसार काम करण्यासाठी देशातील बँकिंग व्यवस्था प्रयत्न करते आहे. बँकांना जागतिक आर्थिक संकटामुळे जोखीम घेण्याच्या मर्यादेचा पुनर्विचार करायला लागतो आहे. बँकांनी त्यांच्याकडे असणाऱ्या मालमत्तेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन सुरू केले आहे. या मुल्यांकनानुसार बँकांकडून सुधारणेसाठी पावले टाकण्यात येत आहेत, अशी माहिती उर्जित पटेल यांनी दिली आहे.

Leave a Comment