अत्याधुनिक हॉटेल्सना टक्कर देतेय हे प्राचीन हॉटेल


प्राचीन काळापासूनच माणूस दूरवरचे प्रवास करत आला आहे. त्या काळी गावागावातून प्रवासी मुक्कामासाठी धर्मशाळा, सराया बांधल्या जात होत्या. त्यातील कांही आजही अस्तित्वात आहेत. कालांतराने या धर्मशाळांची जागा हॉटेल्सनी घेतली. आता मात्र कितीही दमविणारा प्रवास असला तरी चांगल्या हॉटेलमधला मुक्काम हा सारा शिणवटा दूर करण्यास उपयुक्त ठरतो. जगातले सर्वात जुने हॉटेल जर तुम्हाला पाहायचे असेल तर त्यासाठी जपानला जावे लागेल.

या उगवत्या सूर्याच्या देशात गिनीज बुकमध्ये नोंद झालेले सर्वात जुने हॉटेल आहे. जपानच्या होन्शू बेटावरचे, पहाडात वसलेले निशियामा ओन्सेन केऊनवान हे हॉटेल आठव्या शतकातले म्हणजे १३११ वर्षे जुने आहे व आजच्या अत्याधुनिक हॉटेल्सच्या भाऊगर्दीत या हॉटेलची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. या हॉटेलचा इतिहास सांगतो आताच्या मालकांना ते वंशपरंपरनेने मिळाले आहे व हे हॉटेल चालविणारी त्या वंशाची ही ५२ वी पिढी आहे. फुजिवारा माहितो खानदानाचे हे हॉटेल आहे.

इतक्या वर्षांच्या काळात या हॉटेलात बदल नक्की केले गेले आहेत.या हॉटेलात मुक्काम करणार्‍यांत समुराई, लष्करी अधिकारी व राजकारण्यांपासून ते ऐतिहासिक व्यक्तींच्या वंशजांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. युद्धकाळात जखमी योद्धे या हॉटेलमध्ये येऊन येथील गरम पाण्याच्या कुंडात स्नान करून वेदना कमी करत असत असेही सांगितले जाते. या हॉटेलमागच्या पहाडातून नैसर्गिक गरम पाण्याचे स्त्रोत येतात. ते हॉटस्प्रिंगच्या स्वरूपात हॉटेलात बसविले गेले आहेत. येथून माऊंट फूजीची यात्राही करता येते. हॉटेलमध्ये तुमच्या चपला बूट वापरता येत नाहीत. येथे वापरण्यासाठी वेगळ्या सपात्या दिल्या जातात.

Leave a Comment