स्मशानात झोपलेल्या लोकांच्या छायाचित्राने इराणमध्ये खळबळ


इराणमध्ये गरीबीमुळे स्मशानात झोपण्यास भाग पडलेल्या लोकांच्या छायाचित्रांमुळे खळबळ उडाली आहे यावर मत-मतांतरे व्यक्त होत आहेत. ऑस्कर विजेते प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक असगर फरहादी यांनी अध्यक्ष हसन रूहानी यांना पत्र लिहून “मला लाज” वाटत असल्याचे म्हटले आहे.

इराणच्या माध्यमांमध्ये ही छायाचित्रे प्रकाशित झाली होती. यात सुमारे पन्नास लोक स्मशानातील कबरींमध्ये झोपल्याचे दिसत होते. या लोकांमध्ये दरिद्री आणि व्यसनी लोकांचा समावेश होता. तेहरानच्या पूर्वेला असलेल्या शहरयार या शहरातील ही स्मशानभूमी आहे.

माध्यमांनंतर सोशल मीडियावरही ही छायाचित्रे मोठ्या प्रमाणात पसरली. त्यावर प्रसिद्ध चित्रपट निर्माते असगर फरहादी यांनी अध्यक्ष हसन रूहानी यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी “लाज आणि राग” वाटत असल्याचे म्हटले आहे. काही क्रीडापटू आणि इतर कलाकारांनीही आपला संताप व्यक्त केला आहे.

“मी तेहरानच्या परिसरातच असलेल्या एका दफनभूमीत जगणारे पुरुष, महिला आणि मुलांचे जीवन पाहिले आहे. त्यामुळे लज्जा आणि अश्रूंनी मी भरून गेलो आहे,” असे असगर फरहादींनी लिहिले आहे. सोशल मीडियाद्वारे हे पत्र मंगळवारी प्रसृत करण्यात आले.

“याची जबाबदारी घेण्यास तयार असलेल्या सर्वांसोबत ही लज्जा वाटून घेण्याची मला इच्छा आहे,”, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे. शिवाय, “आपण माणसं नाही आहोत का,” असा सवालही त्यांनी केला आहे.
अध्यक्ष रूहानी यांनीही लगेच या पत्राला उत्तर दिले आहे.

“कबरींमध्ये जगणारे लोक पाहून कोणाला लाज वाटणार नाही? मी पाश्चिमात्य देशांत कार्डबोर्डच्या खोक्यात किंवा मेट्रो स्थानकांवर राहणाऱ्या लोकांबाबत ऐकले होते, मात्र कबरींमध्ये राहणाऱ्यांबद्दल नव्हे. याकरिता आपण सर्वांनी क्षुद्र मुद्दे बाजूला ठेऊन एकत्र यायला हवे आणि देशातील मूलभूत समस्यांकडे लक्ष द्यायला हवे,” असे रूहानी यांनी भाषणात म्हटले आहे.

Leave a Comment