सातशे औषधांवर बंदी, तरीही होतात भारतात बेकायदा औषध चाचण्या


भारतात अनेक औषधांची चाचणी कायदा व नियम न पाळता केली जाते. यामुळे अनेक लोकांच्या जीवाला धोका आहे, अशी माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे. गेल्या वर्षी अशा प्रकारात गुंतल्यामुळे 700 औषधांवर युरोपमध्ये बंदी घालण्यात आली होती, तरीही हा प्रकार सुरूच असल्याचे समोर आले आहे.

अनेक आंतरराष्ट्रीय औषध कंपन्या मोठ्या संख्येने भारतात औषधांच्या चाचण्या करतात. एचआईव्ही/एड्सपासून प्रत्येक प्रकारच्या रोगाच्या जेनरिक औषधांसाठी चाचण्या घेतल्या जातात. यासाठी काँट्रॅक्ट रिसर्च ऑर्गनायझेशन यासारख्या अनेक संस्था काम करतात. या संस्थांमार्फत जगातील मोठ्या मोठ्या कंपन्या मानव-चाचण्या करतात.

रॉयटर्सने या संदर्भात चेन्नई, हैद्राबाद, बेंगळूरु और नवी दिल्लीत औषधांच्या चाचण्यांमध्ये भाग घेणाऱ्या अर्धा डझनापेक्षा अधिक लोकांशी संवाद साधला. तेव्हा या सर्वांनी सांगितले, की त्यांच्यावरील दोन औषधांच्या चाचण्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा कमी अंतर होते. वास्तविक जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमानुसार दोन औषध चाचण्यांदरम्यान किमान 90 दिवसांचे अंतर असायला हवे. याबाबत रॉयटर्सने कॅनडाची कंपनी अॅपोटेक्स इन्क, अमेरिकी कंपनी अॅक्टाविस, अमेरिकी कंपनी एथिक्स बायोलॅब आणि भारताच्या सेलर रिसर्च सेंटरशी संपर्क साधला होता. यातील अॅपोटेक्स आणि एथिक्स बायोलॅबने उत्तर दिले नाही, मात्र “चाचण्यांमध्ये भाग घेणारे लोक एकाच वेळीस वेगवेगळ्या चाचण्यांमध्ये भाग घेऊ शकणार नाहीत, अशी व्यवस्था आम्ही केली आहे,” असे उत्तर अॅक्टाविससाठी संशोधन करणाऱ्या लोटस लॅब्स आणि सेमलर या कंपन्यांनी सांगितले.

भारत औषधांच्या चाचणीचे नियम आहेत मात्र दोन चाचण्यांमध्ये किती अंतर असावे, याबाबत त्यात संदिग्धता आहे. त्यामुळे अनेक गैरप्रकार होतात. गेल्या वर्षी युरोपच्या औषध नियामक संस्थेने अनेक प्रयोगशाळांची चौकशी करून संपूर्ण यूरोपात 700 औषधांवर बंदी घातली होती. या औषधांच्या चाचण्या भारतात झाले होते, असे तपासात आढळले होते.

एकामामोमाग चाचण्यांमध्ये भाग घेतल्याने या व्यक्तींचे आरोग्य बिघडते. त्यातून चाचण्यांमधून मिळणाऱ्या निष्कर्षांवरही परिणाम होतो. या निष्कर्षांवरूनच औषध कंपन्या बाजारात औषधे विकण्याचे परवाने मिळवतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य निरीक्षक स्टेफनी क्रॉफ्ट म्हणाल्या,”दोन वेगवेगळ्या चाचण्यांमध्ये किमान 90 दिवसांचे अंतर असायला हवे. असे झाले नाही, तर रुग्णांना गंभीर धोका होऊ शकतो.”

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment