येथे कबरींशेजारी बसून घेतला जातो पदार्थांचा आस्वाद


हॉटेल्स अथवा रेस्टॉरंट मध्ये जाताना तेथील पदार्थांच्या कवालिटीबरोबरच अॅबियन्स हीही आजकाल महत्त्वाची बाब ठरली आहे. स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेत असताना आसपासचे वातावरण प्रसन्न असेल तर जेवण दोन घास अधिक जाते. अगदी घरात जेवतानाही टिव्हीवर एखादा भयानक सीन दाखविला जात असेल तरी जेवणाची मजा खिडखिडी होते. पण अहमदाबाद मधील न्यू लकी रेस्टॉरंटमध्ये खवय्ये कबरींशेजारी बसूनच पदार्थांचा आस्वाद घेतात असे सांगितले तर कदाचित खरे वाटणार नाही.

होय लकी रेस्टॉरंटची ही हकीकत अगदी सत्य आहे. अहमदाबादच्या लाल दरवाज्यानजीक असलेले हे रेस्टॉरंट १२ कबरी असलेल्या जागेतच सुरू आहे. या कबरींजवळ बसूनच येथे लोक विविध पदार्थांवर ताव मारतात, गप्पा छाटतात व पाटर्याही करतात. या न्यू लकीचे मालक कृष्णन कुट्टी सांगातात त्यांनी ही जागा रेस्टॉरंटसाठी घेतली तेव्हा येथील कबरी हटविण्याचे ठरविले होते. पण नंतर त्यांना काय वाटले की त्यांनी कबरी न हटविण्याचा निर्णय घेतला व या कबरींभोवती लोखंडाचे पिंजरे तयार करून घेतले व शेजारीच टेबले खुर्च्यांची सोय केली. आणि काय आश्चर्य, पाहता पाहता या रेस्टॉरंटने व्यवसायात चांगला जम बसविला. असे समजते की या कबरी सूफी संतांच्या शिष्यगणांच्या आहेत. रेस्टॉरंट उघडले की प्रथम साफसफाई करून या कबरींना फुले व चादर चढविली जाते व नंतर व्यवसायाची सुरवात केली जाते.

या रेस्टॉरंटला २००४ मध्ये प्रसिद्ध चित्रकार मकबुल फिदा हुसेन यांनी भेट दिली होती व त्यांनी एक चित्र बनवून हॉटेल मालकांना भेट दिले होते असेही सांगतात.

Leave a Comment