नववर्षात इस्रो रचणार विश्वविक्रम


बंगळूरू – भारतीय अवकाश संशोधन संघटना (इस्रो) एकाच वेळी ८३ उपग्रह अवकाशात सोडून एक नवा विश्‍वविक्रम गाठण्यास सज्ज झाली असून इस्रो नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात तीन भारतीय व ८० परकीय उपग्रह पीएसएलव्ही-सी३७ या प्रक्षेपकातून एकाच वेळी सोडणार आहे.

सध्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेवर काम सुरू असून, ही मोहीम जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राबविली जाईल. याची तारीख अद्याप निश्‍चित केली नाही, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांनी दिली. गेल्या महिन्यात या मोहिमेचा प्रारंभ झाला. परकीय उपग्रहांचे प्रक्षेपण व्यावसायिक पातळीवर करण्यात येईल. इस्रोने अँट्रिक्‍स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीशी केलेल्या करारानुसार ही मोहीम राबविण्यात येईल, अशी माहिती जितेंद्र प्रसाद यांनी लोकसभेत दिली होती. यातील ८० उपग्रह इस्राईल, कझाकिस्तान, नेदरलॅंड्‌स, स्वित्झर्लंड व अमेरिका या देशांची आहेत. या सर्व उपग्रहांचे एकत्रित वजन ५०० किलोग्रॅम आहे. कॅटोसॅट -२ या भारतीय उपग्रहाचे वजन ७३० ग्रॅम, तर आयएनएस-आयए व आयएनएस-१बी या उपग्रहांचे वजन ३० किलो आहे.

इस्रोसाठी पुढील वर्ष अत्यंत धावपळीचे ठरणार असून ४८ ट्रान्सपॉंडरसह जीसॅट-१७, त्यानंतर १२ ट्रान्सपॉंडरच्या सार्क उपग्रह यांचे उड्डाण इस्रो करणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेले जीसॅट-११ व जीसॅट-१९ ची मोहीम आहे. १४ गिगाबाइट व ९० गिगाबाइट क्षमतेचे मल्टिबिम उपग्रहावर काम करण्यात येणार असल्याचे किरण कुमार यांनी सांगितले.

Leave a Comment